चांदणी चौकात तीन टप्प्यांत वाहतूक ! कोंडी फोडण्यासाठी पुणे प्रशासनाकडून उपाययोजना

कोथरूड, दि. 14 (प्रतिनिधी) -चांदणी चौकातील महामार्गावरील लेनची संख्या वाढल्यामुळे रस्ता रूंद झाला आहे. मात्र, चौकातून पुढे गेल्यावर रस्ता अरूंद असल्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न अद्याप पूर्णपणे सुटलेला नाही. यावर पर्याय म्हणून वाहतूक विभागाकडून आता महामार्गावर तीन टप्यात वाहतूक सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे महामार्गावरील कोंडी सुटण्यास मदत होईल.
चौकातील पूल पाडल्यानंतर रस्ता रूंदीकरणासाठी तातडीने लेनची संख्या वाढविण्यात आली. त्यामुळे वाहतूक कोंडीला दिलासा मिळाला. मुळशी, बावधन, पाषाण मुंबईकडून सातारा आणि कोथरूडकडे जाणारी वाहने महामार्गावर येऊन इच्छितस्थळी जातात. त्यामुळे चौकात पाच लेन झाल्या तरी पुढील मार्ग दोन लेनचा असल्यामुळे पुलाच्या अलीकडे होणारी कोंडी आता पुढे होण्यास सुरवात झाली. त्यामुळे जोपर्यंत पर्यायी मार्ग आणि उड्डाणपूल होत नाही, तोपर्यंत चौकातील कोंडी पूर्णपणे सुटणार नाही. यामुळे वाहतूक विभागाने आणि एनएचएआयकडून आता नव्याने पर्यायी मार्ग खुला करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, वाहतूक विभागाकडून मुळशी, बावधन, एनडीएकडून कोथरूड आणि सातारला जाणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र लेन सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे महामार्गावर वाढविण्यात आलेल्या दोन लेन त्यासाठी खुल्या करण्यात येणार असून बॅरिकेट टाकण्यात येणार आहे.
मुंबईकडे जाणारा एक मार्ग बंद…
कोथरूडकडून मुंबईकडे जाणारी वाहने पूर्वी चांदणी चौकातून महामार्गावर येत होती. मात्र, सध्या या रस्त्यावर पुलाचे काम सुरू झाल्यामुळे रस्ता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे ही सर्व वाहने एनडीए रोडकडून वळण घेऊन अप-ऍण्ड अबाऊ हॉटेलकडून मुळशीच्या दिशेने जातात आणि तेथील नवीन पुलावरून मुंबईच्या दिशेने जातात. रस्ता बंद केल्यामुळे वाहनचालकांना मोठा वळसा घालावा लागत आहे.
महामार्गावरील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी बावधन, मुळशी, एनडीएकडून कोथरूड आणि सातारला जाणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र लेन तयार करण्यात आली आहे. त्यामुळे वेदभवन पुलाखाली वाहतूक पोलिसांच्या मदतीने वाहतूक नियोजन करण्यात येईल. – आनंद भोईटे, पोलीस उपायुक्त, वाहतूक विभाग





