पुणे : लष्कर वाहतूक विभागाच्या हद्दीत मेलोडीना रोडवरील नेहरू मेमोरियल चौक (एचपी पेट्रोल पंप) ते नवीन जिल्हा परिषद (ZP) इमारत या दरम्यान महावितरण विभागाकडून भूमिगत उच्चदाब विद्युत वाहिनी केबल टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम आज (दि. १३ डिसेंबर) रात्री ९ वाजल्यापासून सुरू होणार असून साधारणपणे १५ डिसेंबर २०२५ पर्यंत, म्हणजेच तीन दिवस चालणार आहे. या कालावधीत नेहरू मेमोरियल चौक ते एसजीएस मॉल, ऐकरी लेन या मार्गावरील वाहतूक सुरू राहणार आहे. मात्र, आवश्यकता भासल्यास (सार्वजनिक पीएमपीएमएल बसेस वगळता) चारचाकी व दुचाकी वाहनांची वाहतूक एसबीआय ट्रेझरी बँक मार्गे इस्कॉन मंदिर–तीन तोफा चौक या मार्गाने कॅम्प व हडपसर परिसराकडे वळवण्यात येणार आहे. या कामादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आवश्यक तो सर्व बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नागरिकांनी गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा व वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पुणे शहर वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.