Pimpri : अवैध टपऱ्या व पार्किंगमुळे वाहतूक कोंडी कायम

तळेगाव दाभाडे : नगरपरिषदेच्या वतीने लिंब फाटा ते स्टेशन चौक दरम्यान रस्ता रुंदीकरणाचे काम जोमाने सुरू असून वाहतूक कोंडी कमी करून नागरिकांना सुलभ दळणवळणाची सुविधा मिळावी, या उद्देशाने प्रशस्त रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र नागरिकांची सोय होण्याऐवजी या रस्त्यावर अनधिकृत टपऱ्या व अवैध वाहन पार्किंग करणाऱ्यांनी पुन्हा कब्जा केल्याचे चित्र दिसत आहे.
लिंब फाटा, मारुती मंदिर चौक, जिजामाता चौक, मामासाहेब खांडगे चौक ते तळेगाव स्टेशन परिसरात रस्ता रुंदीकरण पूर्ण झाले असले तरी फुटपाथवर पुन्हा टपऱ्या उभ्या राहिल्या आहेत. त्याचबरोबर रस्त्यावर बेकायदेशीर पार्किंगमुळे कृत्रिम वाहतूक कोंडी होत असून नागरिकांना दैनंदिन हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. नगरपरिषदेचा महत्त्वाचा उपक्रम अतिक्रमणामुळे अयशस्वी ठरत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
नगरपरिषदेने या रस्त्यावर रस्ता रुंदीकरणाचे काम केले आहे. फेरीवाला धोरण अंतर्गत अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई करून अतिक्रमण हटवले जाणार आहे.
– विजयकुमार सरनाईक, मुख्याधिकारी, तळेगाव दाभाडे नगरपरिषद





