पुणे – जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील अमरजाई मंदिर ते सोमाटणे येथील काळोखे पेट्रोल पंप या दरम्यान रस्ते विकास महामंडळातर्फे (एमएसआरडीसी) मंगळवार (दि. 16) ते गुरुवार (दि. 18) महामार्गाच्या दुतर्फा असलेले अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली असल्याचे पोलीस उपायुक्त काकासाहेब डोळे यांनी सांगितले. महामार्गालगत अतिक्रमण कारवाई करताना वाहतूक धीम्या गतीने होते. तसेच वाहतूक कोंडी होऊ शकते. जुन्या पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील कारवाई करताना प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली आहे. पर्यायी मार्ग… बंगळूर ते मुंबईकडे जाणारी वाहने सेंट्रल चौक मार्गाऐवजी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाने मुंबईकडे जातील. सोमाटणे फाटा येथून सोमाटणे फाटा एक्झिट रोडने मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून पुढे इच्छित स्थळी जातील. जुना पुणे-मुंबई महामार्गाने मुंबईकडे जाणारी वाहने भक्ती-शक्ती चौकातून मुकाई चौक मार्गे द्रुतगती मार्गाने मुंबई जातील. पुणे ते तळेगावकडे जाणारी वाहने सेंट्रल चौक-गहुंजे शिरगावमार्गे तळेगावला जातील. बंगळुरू महामार्गाने येणारी वाहने किवळे मार्गे, गहुंजे शिरगाव-सोमाटणेमार्गे मुंबईकडे जातील.