संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त तुळापूर परिसरात वाहतूक बदल; जड वाहनांना बंदी

लोणीकंद : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळावर तुळापूर येथे बलिदान दिनानिमित्त 28 मार्च रोजी रात्री 10 वाजेपासून 29 मार्च 2025 रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. पुणे शहराचे पोलीस उपायुक्त (वाहतूक) अमोल झेंडे यांनी मोटार वाहन कायद्याअंतर्गत हे बदल जाहीर केले आहेत. यामुळे तुळापूर परिसरातील वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत राहील. फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका यांसारख्या अत्यावश्यक वाहनांना सूट देण्यात आली आहे, पण जड वाहनांवर कडक निर्बंध लादले आहेत.
पेरणे फाटा, मरकळ मार्गे आळंदी आणि पिंपरी-चिंचवडकडे जाणाऱ्या जड वाहनांना प्रवेशबंदी आहे. मरकळ नदी पूल आणि तुळापूर फाट्यावरून येणाऱ्या डंपर, मिक्सर, टिपर आणि मल्टी-एक्सेल वाहनांना थांबवलं जाईल. वाघोली, भावडी आणि जगताप डेअरीमार्गे तुळापूरकडे येणाऱ्या जड वाहनांनाही बंदी घालण्यात आली आहे. तसेच, सोलापूर रोड, खंडोवा माळ, थेऊर फाटा मार्गे तुळापूर आणि मरकळकडे जाणाऱ्या वाहनांनाही प्रवेश नाकारला जाईल.
या बदलांमुळे बलिदान दिनाच्या कार्यक्रमात कोणताही अडथळा येणार नाही आणि नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित होईल, असं वाहतूक विभागाने स्पष्ट केलं आहे.





