मुंबई : मुंबईत येत्या रविवारी म्हणजे 19 जानेवारी रोजी ‘टाटा मुंबई मॅरेथॉन 2025’चे आयोजन करण्यात आले आहे. या मॅरेथॉनसाठी यंदा 13 हजाराहून अधिक धावपटू धावण्यासाठी तयार आहेत. या मॅरेथॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या टाटा मुंबई मॅरेथॉन 2025 साठी मध्य रेल्वे प्रशासनानेही पुढाकार घेतला आहे. त्यानुसार मध्य रेल्वे टाटा मुंबई मॅरेथॉन 2025 साठी विशेष लोकल चालवणार आहे.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहतीनुसार, मॅरेथॉन मार्ग एमआरए, आझाद मैदान, काळबादेवी, डी.बी. मार्ग, मलबार हिल, वरळी, वांद्रे, दादर आणि माहीम यासारख्या प्रमुख भागातून जाते. त्यामुळे या मार्गांवरील वाहतूक वळवण्यात आली आहे. तसेच, वाहतूक व्यवस्थेवरील संभाव्य ताण कमी करण्यासाठी वाहतूक मार्गांमध्ये बदल करण्यात आला आहे.
मॅरेथॉन सुलभ करण्यासाठी 19 जानेवारी 2025 रोजी पहाटे 3.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. मॅरेथॉन मार्गावरील रस्ते सामान्य वाहतुकीसाठी बंद असतील. तर आपत्कालीन आणि अत्यावश्यक सेवा वाहनांना प्रवेश असेल. याव्यतिरिक्त, दक्षिण मुंबईत पहाटे 2.00 वाजल्यापासून 24 तासांसाठी जड वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी प्रवाशांना गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे.