Traditional Farming – आधुनिक शेतीत यंत्रसामग्रीचा बोलबाला वाढला असला, तरी पुरंदर तालुक्याच्या दक्षिण-पूर्व भागातील शेतकरी आजही पारंपरिक बैलऔतावर विश्वास ठेवताना दिसत आहेत. ट्रॅक्टर आणि आधुनिक अवजारांच्या स्पर्धेतही ऊस बांधणीसाठी बैलजोडीलाच पहिली पसंती मिळत आहे. सध्या गुळुंचे, राख, कर्नलवाडी, रनवरेवाडी परिसरात बैलऔत पाहायला मिळत आहे. नुकत्याच झालेल्या पावसानंतर नवीन लागवडीचा ऊस बांधणीसाठी तयार झाला असून शेतात पुन्हा एकदा बैलांच्या गळ्यातील घंटां नाद घुमू लागला आहे. अनेक शेतकऱ्यांनी ऊस बांधणीसाठी छोट्या ट्रॅक्टरचा वापर सुरू केला असला, तरी काही अनुभवी शेतकरी बैलऔतच अधिक परिणामकारक असल्याचे सांगत आहेत. बैलजोडीच्या सहाय्याने प्रथम तिफणीद्वारे शेत शाकारले जाते आणि त्यानंतर बांधणीच्या नांगराने उसाला माती लावली जाते. या प्रक्रियेमुळे माती अधिक भुसभुशीत होते, उसाची वाढ जोमदार होते आणि मोडतोडही कमी होते, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. खर्चात बचत, रोजगारात वाढ ट्रॅक्टरच्या सहाय्याने ऊस बांधणीसाठी एकरी सुमारे चार हजार रुपये खर्च येतो. त्याउलट बैलऔताने हेच काम साडेतीन हजार रुपयांत होत असल्याने शेतकऱ्यांची प्रतिएकर पाचशे रुपयांची बचत होत आहे. दहा एकर ऊस असलेल्या शेतकऱ्याला जवळपास पाच हजार रुपयांचा फायदा मिळतो. विशेष म्हणजे बैलऔताच्या कामात दोन बैल आणि दोन कामगार लागतात. त्यामुळे एका औतामागे चार जणांना रोजगार मिळतो. ट्रॅक्टरच्या तुलनेत ही पद्धत ग्रामीण रोजगारालाही हातभार लावत आहे. दोन बैलजोड्या मिळून दिवसाला सुमारे तीन एकर ऊस बांधणी करतात, तर ट्रॅक्टर चार एकर काम पूर्ण करतो. मात्र बैलऔताच्या टोळीला दिवसाला सुमारे ११ हजार रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याने हा व्यवसाय पुन्हा तेजीत आला आहे. “सध्या ऊस बांधणीसाठी बैलऔताला चांगली मागणी आहे. त्यामुळे मागील महिन्यात आम्ही एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयांची बैलजोडी खरेदी केली. सध्या काम चांगलं मिळत असल्याने बैल सांभाळणे परवडत आहे आणि आम्हाला रोजगारही मिळतो आहे.” – राजाराम भोसले, शेतकरी, नीरा