पिंपरी | संभाजीनगर येथील साई उद्यानातील खेळण्यांची मोडतोड

जाधववाडी, (वार्ताहर) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवड येथील संभाजीनगर भागात साई उद्यान विकसित करण्यात आले आहे. उद्यानात लहान मुलांसाठी असलेली खेळणी, ट्रॅक, तसेच विविध प्राण्यांच्या प्रतिकृतींची दुरवस्था झाली आहे. याकडे महापालिकेचा उद्यान विभाग दुर्लक्ष करत असल्याने उद्यानात येणार्या लहान मुलांना आनंद घेता येत नसल्याने त्यांचा हिरमोड होत आहे.
सध्या उन्हाळा सुरू आहे. शालेय विद्यार्थ्यांना सुटी लागली आहे. लहान मुलांना शारीरिक कसरती करता याव्यात तसेच घरात बसून बसून वैतागलेल्या मुलांना मोकळी हवा घेण्यासाठी व जीवनाचा मरमुराद आनंद लुटण्यासाठी ज्येष्ठ नागरिक, आई, वडील मुलांना घेऊन उद्यानात येत आहेत. परंतु उद्यानातील लहान मुलांसाठी असलेली विविध खेळण्याचे साहित्य, प्राण्याच्या प्रतिकृती तुटलेल्या, मोडलेल्या अवस्थेत असल्याने त्यांना आनंद घेता येत नाही.
उद्यानात असलेल्या घसरगुंडी, पाळणे, बदक, झोका आदींची मोडतोड झाली आहे. त्यामुळे लहान मुले उद्यानात आपल्याला मरमुरादपणे खेळता, बाघडता येईल या उद्देशाने येतात. परंतु आल्यानंतर त्यांना याचा आनंद घेता येत नसल्याने नाराज देखील होत आहेत. यामुळे महापालिकेच्या उद्यान विभागाने उद्यानातील खेळण्याचे साहित्य, चालण्याचे मार्ग, प्राण्यांच्या प्रतिकृती यांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे.
प्राण्यांच्या प्रतिकृतीची दुरवस्था
साई उद्यानात विविध जंगली व पाळीव प्राण्याच्या प्रतिकृती तयार करण्यात आलेल्या आहेत. यामुळे लहान मुलांना खेळण्याबरोबरच आपल्या देशात असलेल्या विविध प्राण्यांची ओळख होत असते.
परंतु उद्यानात असलेले झेब्रा, हात्ती, मगर, काळवीट, हरीण, गाय आदींच्या प्रतिकृतींची दुरवस्था झाली आहे. याकडे महापालिकेचा उद्यान विभाग दुर्लक्ष करत असल्याने लहान मुलांचा हिरमोड होत असून उद्यानाच्या सौंदर्याला बाधा येत आहे.
साई उद्यान चिंचवड परिसरात प्रसिद्ध आहे. या भागात चिखली, मोरेवस्ती, कुदळवाडी, चिंचवड, कृष्णानगर आदी परिसरातील नागरिक येत असतात. उद्यानात असलेल्या साई मंदिरामुळे परिसरातील साई भक्तांचा देखील मोठा राबता असतो.
बरेच नागरिक मुलांवर संस्कार व्हावेत म्हणून खेळा बरोबरच आरती करण्याची आवड निर्माण व्हावी म्हणून लहान मुलांना येथे घेऊन येतात. परंतु उद्यानातील बहुतांश खेळणी व प्राण्यांच्या प्रतिकृतींची दुरवस्था झाल्याने लहान मुले नाराज होत आहेत. महापालिकेने येथील उद्यानाची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. – स्थानिक नागरिक.





