Toxic Movie Box Office: ‘टॉक्सिक’ची दुसऱ्या दिवशी घसरण; यशच्या चित्रपटाने दोन दिवसांत केली ‘इतकी’ कमाई!
Toxic Movie Box Office ‘टॉक्सिक’ने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर १०१.१० कोटी रुपयांची कमाई केल्याचे आकडे समोर आले होते. विशेष म्हणजे हिंदी भाषिक प्रेक्षकांकडून चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला.

Toxic Movie Box Office: दाक्षिणात्य सुपरस्टार यशचा बहुचर्चित ‘टॉक्सिक’ चित्रपट २६ ऑगस्टला मोठ्या अपेक्षांमध्ये सिनेमागृहात प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात करत १०० कोटींचा टप्पा पार केला. मात्र, पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत मोठी घट झाल्याचे समोर आले आहे.
‘टॉक्सिक’ हा मेगा बजेट चित्रपट असून त्याचे दिग्दर्शन गीतू मोहनदास यांनी केले आहे. चित्रपटात यशसोबत कियारा आडवाणी, हुमा कुरेशी, नयनतारा, रुक्मिणी वसंत आणि तारा सुतारिया यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे प्रदर्शनापूर्वीपासूनच या चित्रपटाची मोठी चर्चा होती.
पहिल्या दिवशी १०१ कोटींची कमाई
‘टॉक्सिक’ने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर १०१.१० कोटी रुपयांची कमाई केल्याचे आकडे समोर आले होते. विशेष म्हणजे हिंदी भाषिक प्रेक्षकांकडून चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. पहिल्या दिवशी हिंदीमध्ये चित्रपटाने तब्बल ५५ कोटी रुपयांचा व्यवसाय केल्याचे सांगण्यात आले. त्याचबरोबर कन्नडमध्ये २३.३० कोटी, तेलुगूमध्ये १६ कोटी, तमिळमध्ये ५.५० कोटी आणि मल्याळममध्ये १.३० कोटी रुपयांची कमाई झाली. या दमदार सुरुवातीमुळे ‘टॉक्सिक’ने पहिल्याच दिवशी १०० कोटींचा टप्पा पार करणाऱ्या भारतीय चित्रपटांच्या यादीत स्थान मिळवले.
दुसऱ्या दिवशी कमाईत मोठी घट
पहिल्या दिवशी शतक ठोकणाऱ्या ‘टॉक्सिक’च्या कमाईत दुसऱ्या दिवशी मात्र घसरण झाली. उपलब्ध आकडेवारीनुसार, गुरुवारी चित्रपटाने सुमारे ३६.४० कोटी रुपयांची कमाई केली. दुसऱ्या दिवशी हिंदी भाषेतील कमाई सुमारे २३ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. पहिल्या दिवसाच्या तुलनेत हा आकडा कमी असला तरी चित्रपटाने दोन दिवसांत चांगली कमाई केली आहे.
दुसऱ्या दिवसाच्या कमाईनंतर ‘टॉक्सिक’चा भारतातील एकूण नेट कलेक्शन सुमारे १३७.५० कोटी रुपयांवर पोहोचल्याचे आकडे सांगतात. तर चित्रपटाचे वर्ल्डवाइड ग्रॉस कलेक्शन सुमारे १९०.७५ कोटी रुपये झाले आहे.

Toxic Movie Box Office
हिंदीमध्ये ‘पुष्पा २’नंतर स्थान
‘टॉक्सिक’ने पहिल्याच दिवशी हिंदी पट्ट्यातही चांगली कामगिरी केली. हिंदीमध्ये सर्वाधिक ओपनिंग करणाऱ्या दाक्षिणात्य चित्रपटांच्या यादीत ‘टॉक्सिक’ दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे सांगण्यात आले आहे. या यादीत ‘पुष्पा २’ आघाडीवर आहे.
तसेच पहिल्या दिवशी १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांच्या यादीतही ‘टॉक्सिक’चा समावेश झाला आहे. या यादीत ‘पुष्पा २’, ‘आरआरआर’, ‘बाहुबली २’, ‘केजीएफ २’ आणि ‘धुरंधर २’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.
नेमकी काय आहे ‘टॉक्सिक’ची कथा?
‘टॉक्सिक’ची कथा १९४० ते १९७० या कालखंडातील गोव्याच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. गुन्हेगारी, तस्करी आणि सत्तेच्या जगात राया हे पात्र स्वतःचे साम्राज्य उभे करण्याचा प्रयत्न करते. यशने रायाची भूमिका साकारली आहे. त्याच्या आयुष्यातील कुटुंबीयांशी असलेले संबंधही कथेत महत्त्वाचे आहेत. विशेषतः त्याची बहीण गंगा म्हणजेच नयनतारा हिच्यासोबतचे नाते कथेत पाहायला मिळते. रायाच्या आयुष्यात नादिया म्हणजे कियारा आडवाणीचे पात्र येते. याशिवाय हुमा कुरेशी, तारा सुतारिया, रुक्मिणी वसंत आणि अक्षय ओबेरॉय यांचीही महत्त्वाची पात्रे आहेत.
चित्रपटातील अॅक्शनला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असला तरी कथानकाबाबत संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. आता दुसऱ्या दिवसानंतरची घसरण चित्रपटाच्या पुढील बॉक्स ऑफिस प्रवासावर किती परिणाम करते, हे आगामी दिवसांत स्पष्ट होणार आहे.





