नवी दिल्ली : दिल्लीतील हवेच्या वाढत्या प्रदूषणाने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणले आहे. याच पार्श्वभूमीवर, इंडिया गेट येथे मोठ्या संख्येने पालक, महिला आणि पर्यावरण कार्यकर्त्यांनी एकत्र येत जोरदार आंदोलन केले. राजधानीतील नागरिकांना स्वच्छ हवा मिळावी, यासाठी सरकारने तातडीने कठोर पाऊले उचलावीत, अशी त्यांची मागणी आहे. अनेक महिला आपल्या लहान मुलांना घेऊन आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. एका पर्यावरण कार्यकर्त्याने सांगितले की, आम्ही निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना भेटू इच्छितो. मुलांचे फुफ्फुस खराब होत असल्याने पालक चिंतेत आहेत. अभ्यास दर्शवतो की, स्वच्छ हवेत न वाढणाऱ्या दिल्लीतील मुलांना सामान्य नागरिकांपेक्षा सुमारे 10 वर्षे आयुष्य कमी जगावे लागेल. या दिवशी दिल्लीत प्रदूषणाची पातळी अतिशय धोकादायक होती. ‘एअर क्वालिटी अर्ली वॉर्निंग सिस्टम’च्या आकडेवारीनुसार, सकाळच्या वेळी वायू गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) 392 नोंदवला गेला, तर अनेक भागांमध्ये तो 400 च्या पुढे गेला होता. यामुळे दिल्लीचा समावेश देशातील सर्वात प्रदूषित शहरांमध्ये झाला.