पुणे – राजा दिनकर केळकर संग्रहालयाने सुरू केलेल्या “थ्रीडी व्हर्च्युअल टूर’ या अनोख्या प्रयोगामुळे नागरिकांना एका क्लिकवर घरबसल्या संग्रहालय पाहण्याची संधी उपलब्ध होत असून या उपक्रमाला लाखो नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे.
“लॉकडाऊन’च्या काळात नागरिकांना संग्रहालय पाहता यावे, यासाठी “राजा दिनकर केळकर संग्रहालया’कडून “थ्रीडी व्हर्च्युअल टूर’चा आगळावेगळा प्रयोग करण्यात आला आहे. सोशल मीडियावर याबाबतच्या लिंक शेअर करण्यात येत आहेत. या प्रयोगाला चांगला प्रतिसाद मिळत असून, मागील 5 ते 6 दिवसांमध्ये तब्बल दोन ते अडीच लाखांपेक्षा अधिक नागरिकांनी संग्रहालयाची झलक पाहिली आहे. डॉ. श्रीकांत केळकर यांनी याचे थ्रीडी चित्रीकरण केले आहे. अमित पटवर्धन, अनिरुद्ध करमरकर, मंगेश ठोंबरे यांनी तांत्रिक काम पाहिले.
संग्रहालयाने सुरू केलेल्या “व्हर्च्युअल टूर’ला नागरिकांकडून अप्रतिम प्रतिसाद मिळत आहे. येत्या 18 मे रोजी “आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिना’चे औचित्य साधून ही संकल्पना प्रसारित करणार होतो. मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर संग्रहालय बंद असल्याने नागरिकांना संग्रहालयाला भेट देता येणार नाही, त्यामुळे घरबसल्या संग्रहालयाची झलक पाहता यावी, यासाठी आम्ही ही संकल्पना राबवत आहोत. करोनाचे संकट दूर झाल्यानंतर, थ्रीडी टूरपाहून मोठ्या संख्येने नागरिक संग्रहालयाला भेट देतील अशी अपेक्षा आहे, असे संग्रहालयाचे संचालक सुधन्वा रानडे यांनी सांगितले.