‘लायन्स पॉइंट’वर पर्यटकांना ‘नो एण्ट्री’

“थर्टी फर्स्ट’, नववर्षाच्या पार्श्‍वभूमीवर लोणावळा पोलिसांच्या सूचना

लोणावळा – लायन्स पॉइंट परिसरात सुरू असलेली हुल्लडबाजी, गर्दीमुळे होणारी वाहतूक कोंडी या पार्श्‍वभूमीवर वन विभागाने 30 आणि 31 डिसेंबर रोजी लायन्स पॉइंट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. व्यावसायिकांना त्यादृष्टिने सूचना देण्यात आल्या आहेत. मागील दोन दिवस याठिकाणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी बेकायदा हुक्‍का विक्री करणाऱ्या पाच जणांना गुन्हे दाखल करत मुद्देमाल हस्तगत केला आहे.

बेकायदा हुक्‍का विक्रीमुळे लायन्स पॉइंट बदनाम झाला आहे. थर्टी फस्ट आणि नववर्षाच्या स्वागता दरम्यान या भागात येणाऱ्या पर्यटकांकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता वरिष्ठांच्या आदेशान्वे हा निर्णय घेतला असल्याची माहिती मावळ वन विभागाने दिली. सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत करण्याकरिता हजारो पर्यटक लोणावळ्यात येतात. पार्ट्यांकरिता शांत जागा म्हणून पर्यटक शहरांपासून वन विभागाच्या जंगल भागात जाण्याला पसंती देतात.

दारू पार्ट्या, हुक्का व अंमली पदार्थाच्या रेव्ह पार्ट्या यांचा यामध्ये समावेश असतो. अनेक वेळा उपद्रवी पर्यटकांकडून जंगले पेटविण्याचे, जाळा करिता झाडे तोडण्याचे प्रकार घडतात. वन्य जीव व वन संपत्तीला यामुळे धोका निर्माण होत असल्याने वन विभागाने लायन्स पॉइंट, टायगर पॉइंट, राजमाची किल्ला, विसापूर किल्ला परिसर, पवनानगरचा परिसर, शिरोता व ताम्हिणी घाट परिसर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

थर्टी फस्ट पार्ट्यांकरिता काही पर्यटक जंगलाचा आसरा घेतात. त्यामुळे वन्य जिवांचे व वन्य संपत्तीचे नुकसन होतो, तसेच वन विभागाच्या जागेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता वन विभागाचे कर्मचारी पुढील काही दिवस रात्रदिवस पहारा देणार आहेत. वन विभागाच्या जागेत कोणी अतिक्रमण वा पार्ट्या केल्यास त्यांच्यावर वन विभागाच्या कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. वन विभागाच्या या निर्णयामुळे हुल्लडबाजांना आळा बसेल, तसेच पर्यटकांच्या आनंदावर मात्र विरजन पडणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.