Nepal Protest | नेपाळच्या Gen-Z च्या क्रांतीनंतर राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. दोन दिवस सुरू असलेल्या तेथील हिंसक परिस्थितीमुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये महाराष्ट्रातील काही पर्यटक अडकले आहेत. महाराष्ट्रातील पर्यटकांना सुखरुप परत आणण्यासाठी राज्यसरकार युध्दपातळीवर प्रयत्न करत आहे. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालय तसेच महाराष्ट्र सदन यांच्या माध्यमातून राज्य शासन नेपाळमधील भारतीय दुतावासाच्या संपर्कात आहेत. राज्यातील पर्यटकांना आवश्यक ती मदत पुरविण्याचे प्रयत्न करत आहे. नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील १५० पर्यटकांमध्ये ठाणे जिल्ह्यातील ६५, पुणे ५, मुंबई ६, अकोला १०, यवतमाळ १, लातूर २, कोल्हापूर जिल्ह्यातील एका पर्यटकाचा समावेश आहे. तर बीड जिल्ह्यातील ११ पर्यटक बसद्वारे उत्तर प्रदेशात सुखरुप पोचले आहेत. राज्यातील पर्यटक ६ टूर ऑपेटरच्या माध्यमातून नेपाळमध्ये पर्यटनाला गेले होते. नेपाळमधील विमान व रस्ते वाहतूक ठप्प झाल्याने सर्व पर्यटकांचा हॉटेलात मुक्काम आहे. सर्वाधिक पर्यटक ठाणे जिल्ह्यातील मुरबाडमधील ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील रहिवासी असलेले काही पर्यटक हे नेपाळमधील दंगलीमुळे नेपाळमध्येच भीतीच्या छायेखाली हॉटेलमध्ये वास्तव करत आहे. नेपाळमध्ये अडकलेले हे पर्यटक सुखरूप भारतात परत यावेत यासाठी मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस आणि ठाणे जिल्हाधिकारी पांचाळ यांच्याशी संवाद साधला. सर्वाधिक पर्यटक ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील असल्याचे सांगितले जात आहे. सर्व पर्यटक सुरक्षित – अजित पवार दरम्यान, पर्यटक काठमांडू, पोखरा, पुरंग येथील हॉटेलमध्ये निवासाला असून त्यांच्याशी राज्य सरकार संपर्कात आहे. पर्यटकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. अडकलेल्या पर्यटकांना आवश्यक ती मदत करण्यासाठी राज्य शासन तत्पर असून त्यांच्याशी संपर्क साधून आहे. सर्व पर्यटक सुरक्षित आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. राज्य आपत्कालीन केंद्र, महाराष्ट्र नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत असून अधिकृत माध्यमांद्वारेच माहिती प्राप्त करावी व अफवांपासून दूर राहावे, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्रामार्फत करण्यात आले आहे. आता काठमांडू, पोखरा, बीरगंज सारख्या शहरांमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. काल नेपाळी लष्कराने त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळाचा ताबा घेतला आहे. याठिकाणी निदर्शकांनी विमानतळ परिसरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. नेपाळमधील निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर विमानतळावरील विमान सेवा अंशतः स्थगित करण्यात आली. पंतप्रधानपदाचा राजीनामा देणारे केपी शर्मा ओली हे नेपाळमध्ये आहेत परंतु सुरक्षित ठिकाणी गेले आहेत. हेही वाचा: ट्रम्प यांचे जवळचे सहकारी चार्ली कर्क यांची गोळ्या झाडून हत्या ; विद्यापीठातील चर्चेदरम्यान हल्ला