आ. सुनील शेळकेंच्या पाठपुराव्याने मावळच्या विकासाची गाडी “ट्रॅक’ वर!
तळेगाव दाभाडे – निसर्गसौंदर्यासोबतच गड-किल्ले आणि प्राचीन मंदिर, लेण्या लाभलेल्या मावळ तालुक्याला पर्यटनाच्या दृष्टिकोनातून चालना देण्यासाठी आमदार सुनील शेळके यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी येत्या अर्थसंकल्पात मावळ तालुक्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी भरीव तरतूद करण्यास हिरवा कंदील दाखविल्याने तालुक्याच्या विकासाची गाडी “ट्रॅक’ वर आली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्यासोबत एक बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ही चर्चा झाली असल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली. मावळ तालुक्यातील महत्त्वाचे असणारे तीर्थक्षेत्र कार्ला येथील एकवीरा देवस्थान तसेच लोहगड-विसापूर, राजमाची किल्ले, भाजे लेणी ही ऐतिहासिक स्थळे सुप्रसिद्ध आहेत. एकवीरा देवी कार्ला देवस्थान येथे संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक येत असतात. या ठिकाणी मूलभूत सुविधांची कमतरता आहे. तसेच हे देवस्थान उंचावर असल्याने दर्शनाला जाताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, याकडे आ. शेळके यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे लक्ष वेधले.
गडकिल्ले ही आपल्या महाराष्ट्राची शान व अस्मिता असून त्यांचे पावित्र्य व इतिहास चिरंतन राहिला पाहिजे. दरवर्षी हजारो पर्यटक या किल्ल्यावंर भेटी देऊन छत्रपतींच्या शौर्याची नवप्रेरणा घेतात. आपला सांस्कृतिक वारसा आपणच जपायला हवा. तसेच पर्यटन वाढीला चालना देण्यासाठी या पर्यटन स्थळांचा विकास होणे गरजेचे आहे. सोयीसुविधा उभ्या राहणे महत्वाचे आहे. या अनुषंगाने विविध व आवश्यक विकासकामांकरीता भरीव निधीची आवश्यकता आहे, अशी मागणी आ. सुनील शेळके यांनी यावेळी केली.
यावेळी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी येणाऱ्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात येईल, अशी ग्वाही आ. सुनील शेळके यांना दिली, तसेच मावळ तालुक्याच्या प्रगतीसाठी हा चांगला निर्णय असेल, अशी आशाही व्यक्त केली.