प्रभात वृत्तसेवा कार्ला – लोणावळ्याजवळील विसापूर किल्ल्यावर जाणाऱ्या निसरड्या पायवाटेवरून पाय घसरून पडल्याने एका तरुण पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. अब्राहम शिंसे (वय २९, रा. रामवाडी, पुणे) असे मृत व्यक्तीचे नाव असून, तो आपल्या मित्रांसोबत भाजे लेणी व विसापूर किल्ला परिसरात भटकंतीसाठी आला होता.मिळालेल्या माहितीनुसार, भाजे धबधब्याच्या बाजूने विसापूर किल्ल्याकडे जाणारी एक पायवाट आहे. या मार्गावरून पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. अब्राहमही याच पायवाटेने किल्ल्याकडे जात असताना त्याचा पाय घसरून तो दगडावर जोरात आदळला आणि जागीच गतप्राण झाला. घटनेची माहिती मिळताच शिवदुर्ग रेस्क्यू टीमने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य हाती घेतले. अपघातग्रस्त पर्यटकाला स्ट्रेचरच्या साहाय्याने खाली आणण्यात आले. यात सागर कुंभार, सागर दळवी, मोरेश्वर मांडेकर, यश मसने, राजेंद्र कडू, पिंटू मानकर, ओंकार पडवळ, अशोक उंबरे आदींनी सहकार्य केले. सध्या परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे डोंगराळ भागातील पायवाटा अत्यंत निसरड्या व धोकादायक बनल्या आहेत. काही पर्यटक सेल्फी, स्टंट किंवा रील व्हिडिओ तयार करताना सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे जीव गमविण्याच्या घटना घडत आहेत. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांकडून वारंवार सूचना देण्यात येत असूनही पर्यटक अति उत्साहाच्या भरात धोका पत्करत आहेत. विशेषतः भाजे धबधबा परिसरातून विसापूर किल्ल्याकडे जाणारी पायवाट निसरडी, अरुंद आणि कठीण असल्याने ती टाळावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.