महाबळेश्वरमध्ये पर्यटकांना आजपासून प्रवेश बंद

बाजारपेठेतही स्वयंघोषित कर्फ्यू; अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद
महाबळेश्वर – विविध संघटनांचे प्रतिनिधी व नागरिकांशी चर्चा केल्यानंतर महाबळेश्वर पालिकेने आजपासून पर्यटकांसाठी शहरात प्रवेशबंदी केली आहे. पर्यटकांना शहरात प्रवेश न देता नाक्यावरूनच परत पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी तात्काळ सुरू करण्यात आली आहे. बैठकीतील निर्णयानुसार शहरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद केली असून यामधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत.
तहसीलदार सुषमा चौधरी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पालिकेच्या प्रांगणात हॉटेल व्यावसायिक संघटना, किराणा व्यापारी असोसिएशन, टॅक्सी संघटना, कॅन्व्हासर संघटना, व्यापारी संघटना, घोडा व्यवसायिक संघटना, फूटवेअर असोसिएशन, सलून व्यावसायिक संघटना, टूर्स अँड ट्रॅव्हल्स असोसिएशन, ब्रेड अँड बटर संघटना, स्ट्रॉबेरी विक्रेता संघटना, हातगाडी संघटना यांचे प्रतिनिधी व नागरिकांची बैठक आज झाली. बैठकीस नगराध्यक्ष स्वप्नाली शिंदे, मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील, माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, किसनराव शिंदे, युसूफ शेख, विमल पारठे व नगरसेवक उपस्थित होते.
प्रशासनाकडून कोणावरही सक्ती करण्यात येणार नाही; परंतु तुम्ही स्वत:हून प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद दिला पाहिजे. पुढील दोन आठवडे सर्वांसाठी महत्त्वाचे आहेत. या काळात आपले शहर करोना संक्रमणापासून मुक्त रहावे, असे वाटत असेल तर सर्वांनी मिळून खबरदारी घेणे आवश्यक आहे. नागरिकांच्या आरोग्याची सुरक्षा महत्त्वाची आहे.
त्यासाठी प्रशासन उपाययोजना करत असून तुमच्याकडून प्रशासनाला सकारात्मक प्रतिसाद हवा आहे, असे आवाहन सुषमा चौधरी यांनी केले. अमिता दगडे-पाटील, स्वप्नाली शिंदे, डॉ. नंदकुमार भांगडिया यांनी मनोगत व्यक्त केले. प्रशासनाने केलेल्या आवाहनास महाबळेश्वरकरांनी प्रतिसाद दिला. आज सकाळी सुरू झालेली बाजारपेठ दुपारनंतर कडकडीत बंद करण्यात आली. आता महाबळेश्वरची बाजारपेठ 31 मार्चपर्यंत बंद राहणार आहे. एसटी आगारानेही लांब पल्ल्याच्या बसफेऱ्या रद्द केल्या असून स्थानिक बसफेऱ्यांची संख्या 70 टक्के कमी करण्यात आली आहे.
पुणे, मुंबई येथील करोनाबाधित रुग्णांना पुढील उपचारासाठी महाबळेश्वरला आणण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी अमिता दगडे यांनी दिल्याचे वृत्त एका वृत्तपत्राने प्रसिद्ध केले होते. त्याबाबत विचारले असता, अशा प्रकारची प्रतिक्रिया मी दिलेली नाही. माझे नावे घेऊन चुकीचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे. याबाबत मी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व संबंधित वृत्तपत्राकडे खुलासा पाठविला आहे, असे मुख्याधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.





