वाई परिसरातील पर्यटन आनंददायी

धार्मिक आणि ऐतिहासिक ठिकाणांची रेलचेल

सातारा जिल्हा हा खरे तर देशातील सर्वोत्तम पर्यटन जिल्हा मानला जातो आहे. या जिल्ह्यातील वाई तालुकाही पर्यटनाच्या दृष्टीने समृद्ध आहे. महाभारतकाळातील विराट राजाची नगरी म्हनजे वाई. कृष्णा नदीच्या काठावर दक्षिण काशी म्हणून वाई हे विख्यात धार्मिक क्षेत्र आहे. कृष्णा नदीवर अनेक घाट व प्राचीन मंदिरे आहेत. सरदार रास्ते यांनी वर्ष 1672 मध्ये एकाच दगडातून घडविलेली ढोल्या गणपतीची भव्य मूर्ती, सिध्देश्‍वर मंदिर, त्यातील सिध्दनाथची संजीवन समाधी, गंगा रामेश्‍वर, काशी विश्‍वनाथ, लक्ष्मी नारायण, समर्थ रामदास स्वमी स्थापित रोकडोबा हनुमान मंदिर अशी मंदिरे आहेत.

स्वामी केवलनांद यांनी येथे वेदशास्त्राची शिकवण देणाऱ्या प्राज्ञ पाठशळेची स्थापना केली. मराठी विश्‍वकोशाचे प्रकाशन वाई येथूनच होते. वाईहून पाचगणीकडे जाताना पसरणीच्या घाटाच्या सुरुवातीलाच सरकारचे रेशीम उत्पादन केंद्र आहे. येथे 30 एकर क्षेत्रावर तुतीची लागवड होत असून त्यावर रेशमी किडे पोसले जातात.

ढोल्या गणपती

ढोल्या गणपती मंदिरामुळे वाईची प्रसिध्दी वाढली आहे. गणपती आळीच्या घाटावर कृष्णा तीरी हे वाईतील सर्वात मोठे व भव्य मंदिर पेशव्यांचे सरदार गणपतराव भिकाजी रास्ते यांनी बांधले. गाभाऱ्यात गणपतीची पाषाणाची 6 फूट उंच व लांबी 7 फूट अशी बैठी मूर्ती आहे. मंदिराच्या भव्य सभागृहाला तीन्ही बाजूंनी कमानी आहेत.

गणपती मंदिराजवळ काशिविश्‍वेश्‍वर हे शंकराचे मंदिर आहे. पूर्वेस महाव्दार व त्यावरती नगारखान्याची खोली आहे. मंदिरासभोवताली तटबंदीची उंच व रुंद अशी भिंत आहे. महाव्दारातून आत गेल्यावर दगडी मंडप, दोन दीपमाळा व नंदी मंडप दिसतो. या नंदीची भव्य मूर्ती कुळकुळीत अशा चकचकीत पाषाणाची व सुबक आहे. गाभाऱ्यात खालवर खाली शिवलिग आहे.

रायरेश्‍वर डोंगरावरील रायरेश्‍वर मंदिरात शिवाजी महाराजांनी आपल्या मावळयांसमवेत हिन्दवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती. गडावरुन वाई व भोरचा परिसर तसेच पश्‍चिमेस कोकण प्रांतातील सावित्री नदीचे खोरे दृष्टीस पडते.

धोम  धरण

वाईपासून 10 कि.मी. अंतरावर असलेले धोम धरण प्रसिद्ध आहे. येथेच कृष्णा नदीच्या काठावर बांधलेलं महादेवाचं मंदिर पाहण्यासारखं आहे. भुईंज  हे गाव सातारा-पुणे रस्त्यावर वसले आहे. भृग ऋषींची समाधी येथे आहे. त्या नावावरुन या गावाला भुईज नाव पडले. मंदिराच्या खाली ऋषींची समाधी व ध्यान धारणेची खोली आहे.

काळूबाई मंदिर, मांढरदेव –

महाराष्ट्रामध्ये प्रसिध्द असलेले व लाखो भाविकांचे कुलदैवत असलेले काळुबाई ठाणे, मांढरदेवी डोंगरावर आहे. डोंगराच्या पठारावर मांढरदेव हे गांव आहे. या पठराची समुद्र सपाटीपासून उंची 4517 फूट आहे. काळूबाईचे मंदिर किमान 350 वर्षापूर्वीचे आहे.

मेणवली
कृष्णा नदी काठी असलेले मेणवली गावात पेशवाईतील एक मुत्सद्दी व राजकारणी नाना फडणवीस यांचा गढीचा वाडा आहे. कृष्णा नदीच्या काठावरील केदार घाट व मंदिर प्रेक्षणिय आहेत. घटावरील एका छोटया मंदिरात भली मोठी धातूची घंटा अडकविली आहे. वसई युध्दातील विजयानंतर चिमाजी अप्पा यांनी येथील किल्ल्‌यावरुन पोर्तुगीजांची ही एक क्विंटल वजनाची घंटा येताना विजय चिन्ह म्हणून आणली होती. नदी काठावरील घाट चंद्रकोरी आकाराचा असून मेणवलेश्‍वराचे प्राचीन मंदिर आहे.
पांडव गड – वाई शहरापासून 6 किमीवर वायव्य दिशेला हा गड आहे. चौकोनी आकाराचा माथा असलेला हा गड आहे. पन्हाळ्याचा शिलाहार राजा भोज याने इ.स. 1200 च्या दरम्यान हा किल्ला बांधला. गडावर जाण्यासाठी पहिला डोंगर चढून दुसरा उंच डोंगर चढावा लागतो. वाटेत विहीरी आहेत. पायवाट अरुंद व धोक्‍याची आहे. माथ्यावर पाण्याची अनेक तळी आहेत. पडलेल्या वाड्याच्या मध्यभागी पांडजाई देवीचे व दुसरे एक अशी देवीची दोन मंदिरे आहेत.

वैराटगड –

वाई शहराच्या आग्नेय दिशेला 8 कि.मी. अंतरावर वैराटगड आहे. हा गडही पन्हाळ्याचे शिलाहार राजाने बांधला आहे. गडावर जाण्यासाठी रस्ता अरुंद व कच्चा आहे. गडावरचा सपाट भाग थोडा रुंद आहे. गडावर शंकर दत्त आणि मातंगी देवी यांची मंदिरे आहेत. गडावर काही चोरवाटा आणि चोरघरे आहेत. आणिबाणीच्या प्रसंगी दडून राहण्यासाठी याचा वापर केला जात असे. या गडावर एक वैशिष्ट्‌यपूर्ण असे एक तळघर आहे. जमिनीच्या आत असलेले हे तळघर अतिशय विस्तृत आहे. फूट पेक्षा जास्त लांब हे भूयार आहे.  वाई शहराच्या वायव्येला सपाट चौकोनी आकाराचा माथा दृष्टीस पडतो तोच हा केंजळगड, हा गड रायरेश्‍वर व पांडवगड या किल्ल्‌यांच्यामध्ये आहे.

कमळगड –

कमळगड हा एक वैशिष्ट्‌यपूर्ण असा एक गड आहे. खाली निळे पाणी आणि वर निळे आकाश यांच्या पार्श्‍वभूमीवर कमळगड शोभून दिसतो. या गडाला कोणतेही बांधकाम नाही. तो मुद्दाम कोणी बांधला असेल असे वाटत नाही. यालाच नवरा-नवरीचा डोंगर असेही म्हणतात.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.