Shambhuraj Desai : पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांची पर्यटकांच्या सुरक्षेसाठी तत्परता; जम्मू-काश्मीर प्रशासनाशी साधला थेट संपर्क

कोयनानगर : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडले. या हल्ल्याचा महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. तसेच, हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुरक्षेसाठी तातडीने हालचाली करत जम्मू-काश्मीर प्रशासनाशी थेट संपर्क साधल्याचे त्यांनी सांगितले.
या घटनेत महाराष्ट्रातील दोन पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, आणखी दोनजण जखमी झाले आहेत. या जखमींची प्रकृती सध्या स्थिर असून, त्यांच्यावर योग्य वैद्यकीय उपचार सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर, शंभूराज देसाई यांनी जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, पर्यटन विभागाचे सचिव आणि अनंतनागचे जिल्हाधिकारी यांच्याशी थेट संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली. त्यांनी हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांना सर्वतोपरी वैद्यकीय मदत मिळावी, तसेच अन्य महाराष्ट्रातील पर्यटकांना प्रवास व निवासासाठी आवश्यक सर्व मदत मिळावी, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना विनंती केली आहे.
मंत्री देसाई म्हणाले की, “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जम्मू-काश्मीर प्रशासनाशी सातत्याने संपर्कात आहोत. पहलगाम व नजिकच्या परिसरात असलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना लवकरात लवकर सुखरूप परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.” दहशतवादाविरोधातील लढाईत महाराष्ट्र जम्मू-काश्मीरसोबत खंबीरपणे उभा असून, अशा प्रकारच्या भ्याड हल्ल्यांना एकसंघपणे प्रत्युत्तर देण्याची गरज असल्याचेही मंत्री देसाई यांनी नमूद केले.




