इस्लामपूर -कोल्हापूर जिल्ह्यातील कसबा बावडा सार्वजनिक बांधकाम विभागात उपकार्यकारी अभियंता म्हणून नोकरीस असल्याचे भासवत शासनाची व लोकांची फसवणूक करणारा तोतया अधिकारी संजय मोरे (वय 24 रा. रेठरेहरणाक्ष, ता. वाळवा) याला इस्लामपूर पोलिसांनी अटक केली. त्याच्याजवळील चारचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे. त्याला न्यायालयासमोर उभे केले असता न्यायाधिशांनी 5 जुनपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली. याबाबत माहिती अशी, करोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी सुरू आहे. यामुळे अनेक वाहनांची तपासणी सुरू आहे. संजय मोरे याची पो. ना. उत्तम माळी यांनी चौकशी केली असता कोल्हापूर जिल्हयातील कसबा बावडा येथे सार्वजनिक बांधकाम विभागात उपकार्यकारी अभियंता असल्याचे त्याने सांगितले. माळी यांनी ही बाब पोलिस उपविभागीय अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या कानावर घातली. त्यांनी याप्रकरणाची खात्री करून घेण्यासाठी सहाय्यक स्थापत्य अभियांत्रिकी कुंडलीक रंगराव पाटील यांना प्राधिकृत केले. कुंडलीक पाटील व पोलिस पथक रेठरेहरणाक्ष येथे गेले. तेथे चौकशी केली असता तो गडबडला. तसेच तो शासनाची व लोकांची फसवणूक करत असल्याचे लक्षात आले. मोरे याने त्याच्या घरावर राजमुद्रा असलेला महाराष्ट्र शासन संजय मोरे असा बोर्ड लावलेला होता. तसेच तो वापरत असलेले वाहन महिंद्र एक्सयुव्ही नंबर (एम.एच.46 पी.7179 ) च्यासमोरील काचेवर लाल अक्षरात महाराष्ट्र शासन व एका कागदावर ऑन डयुटी बांधकाम विभाग असे चिटकवलेले आढळून आले. भारताच्या राजमुद्रेचा गैरवापर केल्याप्रकरणी इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला न्यायालयात उभे केले असता शुक्रवार, दि. 5 जूनपर्यंत त्याला पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.