इस्लामाबाद : अफगाणिस्तान आणि पाकिस्तान दरम्यानची तोरखाम सीमा पाकिस्तानने शनिवारी पुन्हा उघडली. गेल्या दोन आठवड्यांपासून ही सीमा बंद असल्यामुळे अफगाणी शरणार्थी पाकिस्तानमध्येच अडकून पडले होते. त्यांना मायदेशी परत जाण्यासाठी हे बॉर्डर क्रॉसिंगचे दरवाजे उघडण्यात आले. दोहा येथे १९ ऑक्टोबर रोजी झालेल्या युद्धबंदीच्या कराराला अनुसरून ही सीमा उघडण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पाकिस्तानातील अफगाणी शरणार्थ्यांना परत पाठवले जाण्याची प्रक्रिया ११ ऑक्टोबरपासून स्थगित करण्यात आली होती. आता तोरखाम आणि चमन या दोन्ही बॉर्डर क्रॉसिंगवरून हे शरणार्थी आफगाणिस्तानमध्ये परत जाऊ लागले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. शुक्रवारी चमन बॉर्डरवरून १० हजार ७०० अफगाण शरणार्थी परत गेले आहेत. आता या शरणाऱ्थ्यांना परत पाठवण्याची प्रक्रिया अधिक व्यापक करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अफगाण शरणार्त्यांना मायदेशी परत पाठवण्याच्या पाकच्या उपक्रमांतर्गत आतापर्यंत अंदाजे १.५६ दशलक्ष अफगाण नागरिक त्यांच्या मायदेशी परतले आहेत. तोरखाम बॉर्डर जरी पुन्हा सुरू करण्यात आली असली, तरी या बॉर्डर क्रॉसिंगवरून व्यापारी वाहतूक आणि शरणार्थ्यांची प्रवासी वाहतूक तात्पुरती स्थगित ठेवण्यात आली आहे, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले. अफगाणिस्तानबरोबर सीमेवर संघर्ष सुरू झाल्यावर या सीमेवरील कर्मचाऱ्यांना माघारी बोलावण्यात आले होते. हे कर्मचारी आता पुन्हा तैनात केले गेले असून तात्पुरत्या छावण्या, अन्न पुरवठा आणि वैद्यकीय मदत फ्रॉन्टिअर कॉर्प्सकडून उपलब्ध करून दिली जाते आहे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानने सीमेवरील शांततेच्या मुद्द्यावर चर्चा पुन्हा सुरू करण्याचे निश्चित केले असून दिनांक ६ नोव्हेंबर रोजी दोन्ही देशांच्या संरक्षण मंत्र्यांमध्ये इस्तंबुल येथे चर्चा होणार आहे.