Top 10 News : प्रभात हा महाराष्ट्रातील आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. राज्य, देश आणि जागतिक पातळीवरील ताज्या घडामोडी आणि सखोल विश्लेषण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो. चला, जाणून घेऊया आज, 03 मे 2026 रोजीच्या टॉप 10 महत्त्वाच्या राजकीय घडामोडी… १) राज्यात उष्माघाताचे बळी वाढले; तापमानाचा नवा उच्चांक राज्यात वाढत्या उष्णतेमुळे उष्माघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असून काही ठिकाणी मृत्यूच्या घटना समोर आल्या आहेत. नागपूर शहरात वेगवेगळ्या भागांत तीन जण बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर मृत घोषित करण्यात आले. या तिघांचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचा संशय असून पोस्टमार्टमनंतरच कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान, यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील अजंती पारधी बेडा गावात 6 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे तिला अर्धा किलोमीटर चालत जावे लागले होते. उष्माघात की पाणीटंचाई, यावर प्रश्न उपस्थित होत आहेत. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातही एका 55 वर्षीय मजुराचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. राज्यातील तापमान उच्चांक गाठत असताना प्रशासनासाठी ही चिंतेची बाब ठरत आहे. २) चिमुकलीच्या वडिलांना मुख्यमंत्र्यांचा फोन नसरापूर येथे चिमुकलीवर झालेल्या अत्याचारानंतर राज्यभर संतापाची लाट उसळलीय. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीडित मुलीच्या वडिलांशी फोनवरून संवाद साधला. या वेळी त्यांनी कुटुंबाला धीर देत आरोपीला कठोर शिक्षा देण्याचे आश्वासन दिले. फडणवीस यांनी म्हटलं की, आरोपीविरोधात लवकरात लवकर चार्जशीट दाखल केली जाईल आणि खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवला जाईल. मृत्यूदंडाची शिक्षा मिळवण्यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांच्या तीव्र भावना लक्षात घेत कायद्यानुसारच कठोर कारवाई होईल, असंही त्यांनी नमूद केले. परिस्थिती समजावून सांगितल्यानंतर पीडितेच्या वडिलांनी आंदोलन मागे घेतले आहे. तसेच कोणत्याही नेत्याने घरी येऊ नये, अशी विनंती त्यांनी केलीय. ३) पवना नदीत बुडून तीन तरुणांचा मृत्यू; पुण्यातील घटना पुणे जिल्ह्यातील पवना नदी परिसरात भीषण दुर्घटना घडली असून तीन तरुणांचा बुडून मृत्यू झालाय. मावळ तालुक्यातील थूगाव येथे ही घटना घडलीय. प्रथमेश शिंदे, अश्विन भालेराव आणि आयान शेख अशी मृतांची नावे आहेत. विकेंड आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे हे तिघे मावळ परिसरात फिरण्यासाठी आले होते. वाढत्या उकाड्यामुळे त्यांनी नदीत पोहण्याचा निर्णय घेतला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही बुडाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि बचाव पथकांनी तत्काळ शोधमोहीम राबवली. मात्र दुर्दैवाने त्यांना वाचवण्यात यश आले नाही. तिन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले असून परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेनंतर प्रशासनाने पर्यटकांना नदी-नाल्यात पोहताना काळजी घेण्याचे आवाहन केलेय. ४) शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : बच्चू कडू अमरावतीत माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत मोठे विधान केलेय. शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करून विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर कडू प्रथमच अमरावतीत आले. त्यांच्या स्वागतासाठी शहरात जंगी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना बच्चू कडू म्हणाले, “एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.” शिंदे हे शब्द पाळणारे आणि जनतेसाठी तत्पर असलेले नेते आहेत. तसेच, “जनतेने पराभूत केल्यामुळे आम्ही नेता स्वीकारला, पण तो कोणताही नव्हे तर एकनाथ शिंदेच आहेत,” असेही कडूंनी स्पष्ट केले. त्यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. ५) मोठी दुर्घटना..! एसीच्या स्फोटाने इमारतीला आग; नऊ जणांचा मृत्यू राष्ट्रीय राजधानी दिल्ली मध्ये भीषण आग लागून नऊ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीय. शाहदरा परिसरातील विवेक विहार येथील चार मजली इमारतीत ही आग लागली. प्राथमिक माहितीनुसार एसीच्या स्फोटामुळे आग लागल्याचा संशय व्यक्त केला जातोय. ही घटना उशिरा रात्री घडली असून पहाटे ३:४७ वाजता अग्निशमन दलाला माहिती मिळाली. त्यानंतर तत्काळ घटनास्थळी पोहोचलेल्या जवानांनी बचावकार्य सुरू केले. आगीने इमारतीतील दुसरा, तिसरा आणि चौथा मजला पूर्णतः वेढला होता. या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला असून १६ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलंय. काही जखमींना उपचारासाठी गुरु तेग बहादूर रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून डीएनए चाचणी करण्यात येणार आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ६) बृजभूषण शरण सिंहवर विनेश फोगटचा गंभीर आरोप ऑलिम्पिक कुस्तीपटू विनेश फोगट हिने भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप केलेत. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत ती म्हणाली की, त्यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या सहा पीडितांपैकी ती स्वतः एक आहे आणि सध्या न्यायालयात तिची साक्ष सुरू आहे. उत्तर प्रदेशातील गोंडा येथे होणाऱ्या कुस्ती स्पर्धेबाबतही तिने आक्षेप घेतला. ही स्पर्धा बृजभूषण यांच्या प्रभावाखाली असल्याने तिथे सहभागी होणे तिच्यासाठी कठीण असल्याचे ती म्हणाली. अशा वातावरणात मी 100 टक्के देऊ शकणार नाही, असेही तिने स्पष्ट केले. विनेशने आरोप केला की स्पर्धेतील पंच, निकाल आणि संपूर्ण व्यवस्था बृजभूषण यांच्या नियंत्रणात असू शकते. सरकार आणि क्रीडा मंत्रालय याकडे दुर्लक्ष करत असल्याचाही आरोप तिने केला. या वक्तव्यामुळे कुस्तीविश्वात पुन्हा खळबळ उडाली आहे. ७) Oben Rorr Evo चा भारतात धमाका, जाणून घ्या भारतीय इलेक्ट्रिक टू-व्हीलर बाजारात Oben Electricची नवी बाईक Oben Rorr Evo दमदार एन्ट्री करत चर्चेत आलीय. आकर्षक डिझाइन, पॉवरफुल परफॉर्मन्स आणि परवडणारी किंमत यामुळे ही बाईक तरुणांच्या पसंतीस उतरत आहे. कंपनीने पहिल्या 10,000 ग्राहकांसाठी खास ऑफर देत एक्स-शोरूम किंमत 99,999 रुपये ठेवली आहे. त्यानंतर ही किंमत 1.25 लाख रुपये होणार आहे. या बाईकचा टॉप स्पीड 110 किमी/तास असून अवघ्या 3 सेकंदात 0 ते 40 किमी/तास वेग गाठते. 9 kW मोटर आणि 250 Nm टॉर्क यामुळे परफॉर्मन्स दमदार मिळतो. 3.4 kWh बॅटरीसह ही बाईक एका चार्जमध्ये 180 किमीपर्यंत रेंज देण्याचा दावा कंपनीने केला आहे. फक्त 90 मिनिटांत 80 टक्के चार्ज होते. 5-इंच TFT डिस्प्ले, स्मार्ट कनेक्टिव्हिटी, अँटी-थेफ्ट सिस्टम आणि 4 रायडिंग मोड्ससारखी हाय-टेक फीचर्सही यात देण्यात आली आहेत. ८) आता मोबाईल नंबर-OTP शिवाय मिळणार आधार आधार कार्डधारकांसाठी मोठा दिलासा देणारी अपडेट समोर आलीय. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने आता मोबाईल नंबर किंवा OTP शिवायही आधार सेवा मिळण्याची सुविधा सुरू केलीय. नव्या ‘फेस ऑथेंटिकेशन’ फीचरमुळे नागरिकांना केवळ चेहरा स्कॅन करून ओळख पडताळणी करता येणार आहे. यासाठी mAadhaar ॲप वापरून आधार क्रमांक किंवा व्हर्च्युअल आयडी (VID) टाकल्यानंतर चेहरा स्कॅन केल्यास थेट आधारची PDF डाउनलोड करता येते. तसेच, मोबाईल नंबर नसल्यास ‘आधार PVC कार्ड’ ऑर्डर करण्याचाही पर्याय उपलब्ध आहे. अधिकृत वेबसाइटवरून अर्ज करून नाममात्र शुल्कात हे कार्ड घरपोच मिळू शकते. हे कार्ड टिकाऊ असून सर्वत्र वैध मानले जाते. दरम्यान, आधारमधील नाव, पत्ता किंवा इतर माहिती अपडेट करण्यासाठी ७५ ते १०० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. नागरिकांनी ही प्रक्रिया अधिकृत माध्यमातूनच करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ९) Kapil Sharma: कपिल शर्माच्या ‘कॅप्स कॅफे’जवळ चौथ्यांदा गोळीबार प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा यांच्या कॅनडातील ‘कॅप्स कॅफे’ परिसरात पुन्हा एकदा गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. २ मे रोजी सरे येथे कॅफेजवळील एका रेस्टॉरंटवर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारल्याचे समोर आलेय. विशेष म्हणजे, गोळीबार थेट कॅफेवर नसून शेजारील ‘चाय सुत्ता बार’ येथे करण्यात आला. मात्र हे ठिकाण कॅफेजवळ असल्याने कपिल शर्मा यांनाच लक्ष्य केल्याची शक्यता व्यक्त केली जातेय. या घटनेनंतर सोशल मीडियावर गँगकडून धमकी देण्यात आली असून “लाइनवर या” असा इशाराही देण्यात आलाय. गेल्या वर्षभरातील ही चौथी घटना असून यापूर्वीही या परिसरात अशाच प्रकारचे हल्ले झाले आहेत. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जातेय काही अहवालांनुसार, त्यांच्या मुंबईतील घरालाही धमकी देण्यात आल्याचे समोर येत आहे. १०) ऋतुराजने पुढे केला हात अन् हार्दिकने फिरवली पाठ… शनिवारी चेपॉक येथे चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सचा ८ विकेट्सनी पराभव केला. चालू हंगामात चेन्नईने मुंबईला दुसऱ्यांदा धूळ चारली असून, या पराभवामुळे मुंबईच्या प्लेऑफमधील आशांना मोठा धक्का बसला आहे. मात्र, सामन्याच्या निकालापेक्षा सामन्यानंतर घडलेल्या एका घटनेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या आणि चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड यांच्यातील ‘हँडशेक’ न करण्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये ऋतुराज हस्तांदोलनासाठी हात पुढे करत असताना, हार्दिक त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुढे निघून गेल्याचे दिसत आहे. यामुळे चाहते हार्दिकवर सडकून टीका करत असून त्याच्या खेळाडूवृत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.