Top10 Entertainment: रील्सवर गाजणाऱ्या ‘दिलरुबा दिलनशीन’चा गायक कोण? ते गाजराचा ज्यूस पिण्याचे फायदे; जाणून घ्या मनोरंजन आणि लाईफस्टाइलच्या TOP10 News
Top 10 Entertainment: मनोरंजन आणि लाईफस्टाइल - TOP 10 News

मनोरंजन आणि लाईफस्टाइल – TOP 10 News
1. बॉलिवूडपेक्षा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत जास्त मान-सन्मान आणि पैसा मिळाला; समीरा रेड्डी स्पष्टचं बोलली
बॉलिवूड अभिनेत्री समीरा रेड्डी सध्या तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आलीये. हिंदी चित्रपटसृष्टीपेक्षा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपल्याला अधिक मान-सन्मान, पैसा आणि स्टारडम मिळाल्याचा खुलासा समीराने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केलाय. समीरा रेड्डीने २००० दशकाच्या सुरुवातीला आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. हिंदी चित्रपटांसोबतच तिने तमिळ, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांमध्येही काम केलं. मुलाखतीदरम्यान आपल्या अनुभवांबद्दल बोलताना समीरा म्हणाली, “मला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत मिळालेला आदर, कलात्मक ओळख, पैसा आणि स्टारडम हे हिंदी चित्रपटसृष्टीच्या तुलनेत कितीतरी पटीने जास्त होते. आज जवळपास १८ वर्षांनंतरही दाक्षिणात्य प्रेक्षकांकडून मिळणारे प्रेम आणि आदर अतुलनीय आहे.”
2. इंडियन आयडॉलने नाकारलं, पण एका गाण्याने देशाला वेड लावलं.! कोण आहे ‘दिलरुबा दिलनशीन’चा गायक? रील्सवर तुफान गाजतोय आवाज…
सध्या सोशल मीडियापासून म्युझिक चार्टपर्यंत एकाच गाण्याची धूम आहे आणि ते म्हणजे ‘दिलरुबा दिलनशीन’! या गाण्याचा गायक रितो रिबा नेमका आहे तरी कोण? अशी चर्चा सगळीकडे होत आहे. अरुणाचल प्रदेशातील पासीघाटमध्ये जन्मलेल्या रितोने यूट्यूबवर कव्हर साँग्स गाऊन आपल्या प्रवासाला सुरुवात केली. २०२२ मध्ये ‘इंडियन आयडॉल १३’ मध्ये त्याने ‘हीर रांझा’ गायलं, मात्र टॉप १५ मध्येही त्याला स्थान मिळालं नाही. पण त्याने हार मानली नाही. आज ‘दिलरुबा दिलनशीन’ने शाझम इंडियाच्या चार्टवर पहिलं स्थान पटकावलं आहे. जुन्या काळातील रोमँटिक संगीत, हळुवार आवाज आणि मनाला भिडणारे शब्द यामुळे हे गाणं रील्सवरही तुफान व्हायरल होत आहे.
3. लेकीच्या ‘ईठा’ चित्रपटाबद्दल बोलताना शक्ती कपूर भावुक
अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या आगामी ‘ईठा’ या चित्रपटाबद्दल तिचे वडील अभिनेते शक्ती कपूर भावुक झाले आहेत. शक्ती कपूर म्हणाले, “कधीकधी मन खूप अस्वस्थ होते. प्रत्येकाचंच असं होत असेल. आयुष्यात ताणतणाव असतो, इन्कम टॅक्स असतो, प्रॉपर्टीज, अनेक भानगडी असतात. यामुळे कधीकधी मन घाबरतं. त्यामुळे कधीकधी डोळे मिटून मी विचार करतो आणि देवाकडे इतकीच प्रार्थना करतो, मला ईठा चित्रपट पाहता यावा.” या चित्रपटातील तिच्या मेहनतीबाबत शक्ती कपूर म्हणाले की, “माझ्या मुलीने ‘ईठा’मध्ये जे काम केले आहे, जी मेहनत घेतली ती उत्तमच आहे. तिचे पाय सुजायचे, असा डान्स आहे. माझ्या मुलीला मी देवाचं दुसरं रूप मानतो. श्रद्धा वर्षातून एक किंवा दोनच चित्रपट करते, पण जेव्हा ती चित्रपट करते, तेव्हा तो मनापासून करते.”
4. साई पल्लवीचा नवा लुक चर्चेत! केस कापल्यानंतर आई-वडिलांना बसला धक्का
दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवी तिच्या नव्या लुकमुळे चर्चेत आलीये. तिचा हा लूक धनुषची मुख्य भूमिका असलेल्या ओम (ऑपरेशन मोल) चित्रपटातील आहे.या भूमिकेसाठी साई पल्लवीने चक्क आपले केस कापले होते. ही गोष्ट तिच्या आई वडिलांना समजल्यानंतर काय घडलं होतं याविषयीचा एक किस्सा तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितला. मुलाखतीत साई पल्लवीने सांगितलं की, केस कापल्यानंतर तिने आई-वडिलांना व्हिडिओ कॉल केला. मात्र, तिचा केस कापल्याचा अवतार पाहून आईला मोठा धक्का बसला आणि तिने थेट फोन कट केला. त्यानंतर साईने पुन्हा आई-वडिलांशी संपर्क साधून आपण केस का कापले, यामागचे कारण समजावून सांगितलं.
5. लाडक्या लेकीच्या निधनानंतर अभिनेत्याने चप्पल घालणंच सोडलं
दाक्षिणात्य सिनेसृ्ष्टीतील लोकप्रिय अभिनेता विजय अँटनीचा २० नोव्हेंबर रोजी त्याचा ‘अप्पा कुट्टी’ हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमात त्यांची पत्नी आणि निर्माती फातिमा विजय अँटनी एक खुलासा केला. सप्टेंबर २०२३ मध्ये अभिनेत्याची 16 वर्षीय मोठी मुलगी मीराचं निधन झालं. लाडक्या लेकीच्या निधनामुळे अभिनेता पूर्णपणे खचला असून त्या दु:खातून तो सावरलेला नाही. अमेरिका, लंडन यांसारख्या ठिकाणांहून अनेक चप्पल आणि बूट खरेदी केले होते. मात्र, मीराच्या निधनानंतर हे ही पादत्राणं पाहून विजय अँटनीला मुलीची आठवण येते. त्यामुळे त्याने यापुढे आयुष्यात कधीही चप्पल किंवा बूट घालणार नसल्याचा निर्णय घेतला. तसेच मीराच्या मनगटावर निधनाच्या वेळी जे घड्याळ होतं, तेच घड्याळ विजय आजही घालतो.”
6. अलका कुबल यांच्या धाकट्या लेकीचा थाटामाटात पार पडला साखरपुडा
मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अलका कुबल यांच्या घरी सध्या आनंदाचं वातावरण आहे. अल्का कुबल यांची धाकटी लेक कस्तुकी आठल्ये आणि संकेत दुधाळ यांचा साखरपुडा नुकताच पार पडला. या खास सोहळ्याचे काही सुंदर फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केले असून, त्यानंतर चाहत्यांकडून कस्तुरीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मोजके कुटुंबीय आणि जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडला. अल्का कुबल यांच्या लेकीबद्दल बोलायचं झाल्यास, कस्तुरी आठल्ये हिने आपलं करिअर मनोरंजनविश्वात न करता वैद्यकीय क्षेत्रात केलं. तिने फिलिपिन्समधून एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
7. शूटिंगच्या एक दिवस आधी आईला कर्करोगाचे निदान; क्रांती रेडकरने शेअर केला भावुक प्रसंग
‘काकण’ चित्रपटानंतर अभिनेत्री आणि दिग्दर्शिका क्रांती रेडकर तिच्या ‘मैत्रेया’ चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. चित्रपटाचे काम सुरू होण्याच्या अवघ्या एक दिवस आधी तिच्या आईला कर्करोगाचं निदान झालं होतं. ‘मैत्रेया’ चित्रपटाच्या प्रीमियरला जाण्यापूर्वी क्रांतीने आईसोबत एक व्हिडिओ शूट केला होता. हा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
‘माझ्याकडे आई आहे. माझी सुखाची व्याख्या,’ असं भावनिक कॅप्शन तिने या व्हिडिओला दिलं आहे. या व्हिडिओमध्ये क्रांतीने तो भावुक प्रसंग सांगताना म्हटलं, “मैत्रेयासाठी ज्या दिवशी मी काम सुरू करणार होते, त्याच्या एक दिवस आधी माझ्या आईला कर्करोगाचे निदान झालं होतं. तुम्ही मला अनेकदा विचारायचात की मी आईसोबत व्हिडिओ का शेअर करत नाही? कारण त्यावेळी आमची मॅडम कर्करोगाशी झुंज देत होती. मात्र, आता ती कर्करोगमुक्त झाली आहे, ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे,” असे तिने सांगितले.
8. गाजराचा ज्यूस पिण्याचे आरोग्यदायी फायदे!
गाजराचा ज्यूस केवळ चवीसाठीच नाही, तर आरोग्यासाठीही फायदेशीर ठरू शकतो. गाजरामध्ये बीटा कॅरोटीन, जीवनसत्त्व अ, जीवनसत्त्व क, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राखण्यास आणि रोगप्रतिकारशक्तीला बळ देण्यास मदत होते. तसेच गाजरातील पोटॅशियम रक्तदाब सामान्य ठेवण्यासाठी उपयुक्त ठरते. याशिवाय बीटा कॅरोटीन आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेच्या पेशींचे संरक्षण करण्यास मदत करतात. त्यामुळे त्वचेचे आरोग्य आणि नैसर्गिक तजेलदारपणा टिकवण्यासाठी गाजराचा आहारात समावेश करू शकता. मात्र, ज्यूसमध्ये अतिरिक्त साखर घालणे टाळावे. शक्यतो लगद्यासह ज्यूस प्यावा.
9. हिवाळ्यात आळस अन् चिडचिड वाढतेय? मूड फ्रेश ठेवण्यासाठी करा ‘हे’ ५ उपाय!
हिवाळ्यात वातावरणातील बदलांमुळे काही लोकांना आळस, थकवा, चिडचिड आणि उदासीनता जाणवू शकते. याला सामान्य भाषेत ‘विंटर ब्लूज’ म्हणतात. सूर्यप्रकाशाचा अभाव, झोपेच्या चक्रात होणारे बदल आणि शारीरिक हालचाली कमी होणे ही त्यामागची प्रमुख कारणे असू शकतात. यापासून दूर राहण्यासाठी दररोज सकाळी काही वेळ उन्हात घालवा, नियमित व्यायाम करा आणि झोपेचे वेळापत्रक पाळा. तसेच संतुलित आहार घ्या आणि मित्र-परिवारासोबत वेळ घालवा. मात्र, सतत उदास वाटत असेल किंवा दैनंदिन कामांवर परिणाम होत असेल, तर मानसिक आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
10. दर तीन महिन्यांनी टूथब्रश बदला; दातांच्या आरोग्यासाठी घ्या काळजी!
टूथब्रशचा वापर करताना त्याची स्वच्छता आणि योग्य वेळी बदल करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. दंत आरोग्य तज्ज्ञांच्या मते, साधारणपणे दर तीन महिन्यांनी टूथब्रश बदलावा. सतत वापरामुळे ब्रशचे ब्रिसल्स झिजतात किंवा वाकतात. त्यामुळे दातांची योग्य स्वच्छता होत नाही. जुन्या ब्रशवर ओलावा आणि जीवाणू जमा होण्याची शक्यता असते. यामुळे दात किडणे, हिरड्यांना सूज येणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. ब्रशचे ब्रिसल्स खराब झाल्यास तीन महिने पूर्ण होण्याची वाट न पाहता तो बदलावा. तसेच प्रत्येक वापरानंतर ब्रश स्वच्छ धुवून हवेशीर जागी कोरडा ठेवावा.







