Weather Update : राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा! ‘या’ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी
Weather Update : काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Weather Update : अरबी समुद्र आणि अंदमान परिसरात मान्सूनची आगेकूच सुरू असतानाच महाराष्ट्रात उष्णतेचा कहर वाढला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये तापमानाचा पारा चांगलाच चढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. दुसरीकडे, पूर्वमोसमी पावसासाठी पोषक हवामान तयार झाल्याने काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
भारतीय हवामान विभागाने (IMD) आज मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. अकोला, अमरावती, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये तापमान मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असून नागरिकांनी दुपारच्या वेळेत शक्यतो घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिणेकडील भागात वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
गेल्या २४ तासांत विदर्भात उष्णतेची तीव्र लाट अनुभवायला मिळाली. अमरावती, अकोला, वर्धा आणि नागपूर येथे तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले. यवतमाळ, चंद्रपूर आणि ब्रह्मपुरी येथेही ४३ अंशांपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली. राज्यातील इतर भागांतही उष्णतेचा प्रभाव कायम असून अनेक शहरांमध्ये तापमान ४२ अंशांच्या आसपास राहिले. याउलट महाबळेश्वर येथे राज्यातील सर्वात कमी २०.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.
‘या’ दिवशी मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार
दरम्यान, IMD च्या अंदाजानुसार मान्सून २६ ते ३१ मेदरम्यान केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर अवघ्या एका आठवड्यात तो महाराष्ट्राच्या सीमेवर पोहोचू शकतो. त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच सुमारे ६ जूनच्या आसपास, मान्सून कोकण किनारपट्टीवर दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हवामानातील बदलत्या घडामोडींमुळे यंदा मान्सून वेळेवर किंवा किंचित लवकर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा : Mumbai Crime news : भांडुपमध्ये खळबळ ! काँग्रेस नगरसेविकेकडून महिलेचे अपहरण, अनैतिक संबधाच्या संशयातून कृत्य






