Jalgaon DCC Bank Election : जळगाव जिल्हा बँकेसाठी आज मतदान; दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
Jalgaon DCC Bank Election : मुक्ताईनगरमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर चाळीसगावमध्ये भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची ठरली आहे.

Jalgaon DCC Bank Election : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीने जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणुकीदरम्यान अनेक नाट्यमय घडामोडी, नाराजीनाट्य आणि राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. आज मतदानाचा दिवस असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. विशेषतः मुक्ताईनगर आणि चाळीसगावमधील लढतींकडे सर्वांचे लक्ष आहे.
जिल्हा बँकेच्या एकूण 21 जागांपैकी 12 जागा महायुतीने बिनविरोध जिंकल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीत महायुतीने आधीच आपले वर्चस्व निर्माण केले आहे. मात्र, उर्वरित जागांसाठी आज प्रत्यक्ष मतदान होत असून, भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सहकार पॅनलसमोर काँग्रेस आणि महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या शेतकरी एकता पॅनलचे आव्हान आहे.
मुक्ताईनगरमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर चाळीसगावमध्ये भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची ठरली आहे. या दोन्ही ठिकाणी भाजप आणि शिंदे सेनेच्या उमेदवारांमध्ये थेट लढत होत असल्याने राजकीय चुरस वाढली आहे.
दरम्यान, जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील उमेदवारीवरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटातही संघर्ष पाहायला मिळाला. शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील आणि त्यांचे पुत्र सुमित पाटील यांच्याविरोधात भाजपचे आमदार मंगेश चव्हाण असा सामना रंगला आहे. उमेदवारीवरून निर्माण झालेल्या वादामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांचीही चर्चा सुरू झाली आहे.
विशेष म्हणजे, या निवडणुकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचीही प्रतिष्ठाही पणाला लागली आहे. महायुतीने 12 जागा बिनविरोध मिळवल्यानंतर उर्वरित जागांवरील निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुक्ताईनगर आणि चाळीसगावमध्ये कोणाला मतदारांचा कौल मिळतो, तसेच जिल्हा बँकेच्या सत्तासमीकरणावर त्याचा काय परिणाम होतो, हे मतदानानंतर स्पष्ट होणार आहे.





