IAS Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांनी अखेर ‘या’ खात्याच्या आयुक्तपदाचा स्वीकारला पदभार
IAS Tukaram Mundhe : मुंढे यांच्या आतापर्यंतच्या २० वर्षांच्या सेवाकाळात तब्बल २५ वेळा बदली झाली आहे. त्यांच्या वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे प्रशासनातील राजकीय हस्तक्षेपाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

IAS Tukaram Mundhe : राज्यातील धडाडीचे, प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष आयएएस अधिकारी म्हणून ओळख असलेले तुकाराम मुंढे यांनी अखेर अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला. सोमवारी सकाळी त्यांनी वांद्रे-कुर्ला संकुलातील अन्न व औषध प्रशासनाच्या मुख्यालयात पदभार स्वीकारला. गेल्या आठवड्यात त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली होती; मात्र त्यांनी तत्काळ पदभार स्वीकारला नव्हता. त्यामुळे त्यांच्या नाराजीची चर्चा प्रशासन आणि राजकीय वर्तुळात रंगली होती.
मुंढे यांची यापूर्वी दिव्यांग सक्षमीकरण विभागातून अचानक बदली करण्यात आली होती. त्यानंतर जवळपास दीड महिना त्यांना कोणतीही नवी जबाबदारी देण्यात आली नव्हती. राज्य शासनातील काही पसंतीच्या अधिकाऱ्यांकडे एकापेक्षा अधिक खात्यांची जबाबदारी असताना मुंढे यांना प्रतीक्षेत ठेवण्यात आल्याने समाजमाध्यमांवरही सरकारवर टीका होत होती.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या अखत्यारीतील अन्न व औषध प्रशासन विभागात त्यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, अन्न व औषध प्रशासन आयुक्तपद हे तुलनेने कनिष्ठ स्वरूपाचे पद मानले जात असल्याने २० वर्षांचा प्रशासकीय अनुभव असलेल्या मुंढे यांची या पदावर नियुक्ती म्हणजे ‘पदावनती’ असल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये व्यक्त होत होती. (IAS Tukaram Mundhe)

IAS Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांनी अखेर ‘या’ खात्याच्या आयुक्तपदाचा स्वीकारला पदभार
विशेष म्हणजे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सचिव धीरज कुमार हे मुंढे यांच्या तुकडीतील अधिकारी आहेत. त्यामुळे प्रशासकीय स्तरावर वरिष्ठता आणि अहवाल सादरीकरणाच्या प्रक्रियेबाबतही चर्चा सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. (IAS Tukaram Mundhe)
दरम्यान, दिव्यांग सक्षमीकरण विभागात कार्यरत असताना मुंढे यांनी बोगस दिव्यांग संस्था तसेच बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी मिळविणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरू केली होती. त्यानंतर त्यांची बदली करण्यात आल्याची चर्चा आहे.
मुंढे यांच्या आतापर्यंतच्या २० वर्षांच्या सेवाकाळात तब्बल २५ वेळा बदली झाली आहे. त्यांच्या वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे प्रशासनातील राजकीय हस्तक्षेपाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. समाजमाध्यमांवर मोठा पाठिंबा असलेल्या मुंढे यांच्या बदलीनंतर सरकारवर टीकेची झोड उठली होती.





