US-India ties: ‘मोदी-ट्रम्प दूरदृष्टी असलेले नेते’; भारत-अमेरिका संबंध अधिक मजबूत होणार : मार्को रुबियो
US-India ties: “ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात सुरू झालेले हे संबंध आता दुसऱ्या कार्यकाळातही अधिक दृढ झाले आहेत. दोन्ही नेत्यांमधील परस्पर समन्वय स्पष्टपणे दिसून येतो,” असे रुबियो म्हणाले.

US-India ties: भारत आणि अमेरिकेतील संबंध सातत्याने अधिक दृढ होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील वैयक्तिक सुसंवाद हा द्विपक्षीय सहकार्याला नवी दिशा देणारा ठरत असल्याचे मत अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी व्यक्त केले.
दिल्लीतील अमेरिकन दूतावासाच्या सपोर्ट अॅनेक्स इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी रुबियो बोलत होते. “ट्रम्प आणि मोदी हे केवळ अल्पकालीन नव्हे, तर दीर्घकालीन उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करणारे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वामुळे भारत-अमेरिका संबंध अधिक मजबूत होत आहेत,” असे त्यांनी म्हटले.
रुबियो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील वैयक्तिक संबंधांचेही विशेष कौतुक केले. “ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात सुरू झालेले हे संबंध आता दुसऱ्या कार्यकाळातही अधिक दृढ झाले आहेत. दोन्ही नेत्यांमधील परस्पर समन्वय स्पष्टपणे दिसून येतो,” असे रुबियो म्हणाले.
Happy to receive the US Secretary of State, Mr. Marco Rubio.
We discussed sustained progress in the India-US Comprehensive Global Strategic Partnership and issues related to regional and global peace and security.
India and the United States will continue to work closely for… pic.twitter.com/CuD0DdDXB7
— Narendra Modi (@narendramodi) May 23, 2026
पीएम मोदींना व्हाइट हाऊस भेटीचे निमंत्रण –
याआधी शनिवारी रुबियो यांनी पंतप्रधान मोदी यांची दिल्लीत सुमारे तासभर भेट घेतली. या बैठकीत प्रादेशिक आणि जागतिक शांतता, सुरक्षा तसेच भारत-अमेरिका व्यापक धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्याबाबत चर्चा झाली. बैठकीदरम्यान रुबियो यांनी ट्रम्प यांच्या वतीने मोदींना व्हाइट हाऊस भेटीचे औपचारिक निमंत्रणही दिले.
बैठकीनंतर मोदी यांनी समाजमाध्यमांवर माहिती देताना भारत-अमेरिका सहकार्य वाढविण्यावर सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगितले.
रुबियो शनिवारी सकाळी कोलकात्यात दाखल झाले. पदभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच भारत दौरा आहे. दिल्लीत येण्यापूर्वी त्यांनी मदर तेरेसा यांच्या ‘मिशनरीज ऑफ चॅरिटी’च्या मुख्यालयाला भेट दिली.
#WATCH | Delhi: At the US Embassy Support Annex Building dedication ceremony, US Secretary of State Marco Rubio says, “It is at the cornerstone of this important partnership between us and India, which, as I said, is an incredibly important one. And it’s the reason why I’m here… pic.twitter.com/KaDnVGZPA7
— ANI (@ANI) May 23, 2026
दिल्लीत ‘क्वाड’ परराष्ट्रमंत्री परिषद –
दौऱ्यात रुबियो रविवारी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करणार असून मंगळवारी दिल्लीत होणाऱ्या ‘क्वाड’ परराष्ट्रमंत्री परिषदेत सहभागी होणार आहेत. तसेच आग्रा आणि जयपूरलाही ते भेट देणार आहेत.
भारत दौऱ्यापूर्वी रुबियो यांनी “भारत हा अमेरिकेचा महत्त्वाचा मित्र आणि धोरणात्मक भागीदार असून दोन्ही देश अनेक क्षेत्रांत एकत्रितपणे काम करत आहेत,” असे विधान केले होते.
या दौऱ्यात अमेरिका-इराण संघर्ष, त्याचे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर होणारे परिणाम, तसेच भारतीय वस्तूंवरील अमेरिकन शुल्कांमुळे निर्माण झालेल्या व्यापारविषयक तणावावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. भारत-अमेरिका धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने या दौऱ्याकडे महत्त्वपूर्ण राजनैतिक घडामोड म्हणून पाहिले जात आहे.





