सुनील तटकरे-शरद पवार यांच्यात भेट ; राजकीय वर्तुळात खळबळ Top 10 News: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी काल रात्री शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची नाव वगळल्याची यादी माध्यमांमध्ये समोर आल्यानंतर तटकरे यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने त्या भेटीला महत्त्व प्राप्त झालं. शरद पवारांची भेट घेऊन आल्यानंतर सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीवर देखील भाष्य केलं. शरद पवारांची तब्येत गेली काही दिवस ठिक नव्हती. त्यामुळे त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेट घेतली, अशी प्रतिक्रिया सुनील तटकरेंनी दिली. या भेटीमागे कोणतंही राजकीय कारण नाही, कोणतंही राजकारण नाही, असंही सुनील तटकरे म्हणाले.तर राष्ट्रीय कार्यकारिणी या विषयावर मला काही बोलायचं नाही. आजची भेट ही केवळ शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी होती, असं सुनील तटकरेंनी स्पष्ट केलं. Ola, Uber आणि Rapido ला मोठा दणका! राज्यात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या अनधिकृत बाईक टॅक्सी सेवांविरोधात परिवहन विभागाने कठोर भूमिका घेतली आहे. ओला, उबर आणि रॅपिडोसारख्या अनधिकृत बाईक टॅक्सी सेवा देणारी ॲप्स तातडीने बंद करून संबंधित कंपनी मालकांवर एफआयआरदाखल करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सायबर क्राईम विभागाकडे पत्राद्वारे केली आहे. त्याचबरोबर परिवहन आयुक्तांनी देखील या संदर्भात सायबर क्राईम विभागाला पत्र पाठवले आहे.राज्यात गेल्या काही महिन्यांपासून विविध ॲप्सच्या माध्यमातून कोणतीही वैध परवानगी, शासन मान्यता किंवा परिवहन विभागाच्या नियमांचे पालन न करता प्रवासी वाहतूक सुरू आहे. रॅपिडोसारख्या संस्थांच्या अनधिकृत बाईक टॅक्सींचे प्रमाण वाढत असून, ही बाब सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असल्याचे मंत्री सरनाईक यांनी पत्रात म्हटले आहे. राज्यासाठी पुढील ५ दिवस महत्त्वाचे ; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट राज्यात सध्या उन्हाचा कडाका प्रचंड वाढला असून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यातील तीव्र उन्हामुळे नागरिक हैराण झाले असतानाच, मे महिन्यानेही उष्णतेची तीव्रता कायम आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवस राज्यातील काही भागांत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.विशेषतः मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांना पुढील तीन दिवसांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. या भागातील नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, बीड जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.दरम्यान, वर्धा, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवसांसाठी उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे. मतीन पटेलांच्या घरावर बुलडोझर कारवाई नाशिकच्या टीसीएस कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान हि एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरात आश्रित होती, त्यामुळं मतीन पटेल यांना पोलिसांनी या प्रकरणात आरोपी केले आहे. परिणामी मतीन पटेल यांना छत्रपती संभाजीनगर महापालिकेने दणका दिलाय, त्यांच्या घरावर आता बुलडोझर कारवाई करण्यात येत आहे. ज्या घरात निदा खान लपलेली होती ते घर बेकायदेशीर अतिक्रमण करून बांधल्याचा ठपका ठेवत हि तोडाक कारवाई करण्यात येत आहे. एवढंच नाही तर मतीन पटेल यांनी स्वतःहूनच घर पडायला सुरुवात केली असून कारवाई होण्यापूर्वीच घर रिकामं केल्याची माहिती समोर येतीय. एकूणच निदा खानला आश्रय देणं एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांना भोवलं असून मतीन पटेल यांचे नगरसेवक पदही घोक्यात आलंय. रुपाली चाकणकर यांच्या अडचणीत वाढ; ईडीने समन्स बजावले Top 10 News: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. रुपाली चाकणकर यांना ईडीने समन्स बजावले आहे. शिवनिका ट्रस्टवर विश्वस्त असताना झालेल्या व्यवहारांची माहिती घेण्यासंदर्भात रूपाली चाकणकर यांना ईडीने समन्स बजावले असून चौकशीसाठी हजर होण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. अशोक खरातने खंडणी रॅकेट चालवून बेनामी बँक खात्यांच्या नेटवर्कमधून ७० कोटींपेक्षा जास्त रक्क वळवल्याचा आरोप आहे. अशोक खरातच्या खरातच्या शिवनिका ट्रस्टवर रुपाली चाकणकर विश्वस्त होत्या. त्यांनी पदाचा गैरवापर करून काही आर्थिक व्यवहार झाले का याचा तपास ईडीच्या माध्यमातून केला जाणार आहे. रुपाली चाकणकर यांची याआधी सीबीआयने तब्बल ५ तास चौकशी केली होती. आता या प्रकरणात ईडीने एन्ट्री केली आहे. भूकंपाच्या धक्क्यांनी हिंगोली हादरली हिंगोलीमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला आहे. प्रशासनाने या भूकंपाची 3.4. रिश्टर स्केअर नोंद झाल्याची माहिती दिली आहे. लातूर येथील भूमापक केंद्रावर या भूकंपाची नोंद झाली आहे. याआधी देखील हिंगोली जिल्ह्यातील वसमत, कळमनूरी, औंढा हिंगोली या तालुक्यात भूकंप झाल्याची नोंद करण्यात आली होती. दरम्यान प्रशासनाने नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. भूकंपाच्या वेळी काय काळजी घ्यावी या संदर्भात सूचना दिल्या आहेत.दरम्यान , मागच्या काही दिवसांपासून या भागात वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. सोन्या-चांदीविषयी सरकारचा मोठा निर्णय पुढील वर्षभर देशवासियांनी सोनं खरेदी करू नये, तसंच पेट्रोल डिझेलचा वापरही कमीत कमी करावा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. तसंच शाळांनीही ऑनलाईन वर्ग सुरु करावेत असंही नरेंद्र मोदी म्हणाले. सलग दोन दिवस नरेंद्र मोदींनी देशवासियांना आवाहन केल्याने विविध चर्चा रंगल्या आहेत. याचदरम्यान,सरकारनं सोने, चांदी आणि इतर मौल्यवान धातूंवरील आयात शुल्क वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, या वाढीव किमती आजपासून लागू होणार आहेत. सोने,चांदीवरील आयातशुल्क 6% वरुन 15% वर करण्यात आली आहे. आजपासूनच 15% आयातशुल्क लागू करण्यात आला आहे. सोने-चांदीची आयात रोखण्यासाठी केंद्र सरकारचे हे महत्वाचे पाऊल असल्याचं बोललं जातय. तसेच सोने आणि चांदीच्या 15 टक्क्यांच्या आयातशुल्कामधील 5 टक्के आयातशुल्क कृषी, विकास कामांवर खर्च होणार असल्याचेही सरकारकडून सांगण्यात येतंय. पाकिस्तानच खरं रूप अखेर जगासमोर आलं इराण-अमेरिका युद्धात एक तटस्थ मध्यस्थ म्हणून आपली प्रतिमा काळजीपूर्वक तयार करण्याचा केविलवाणा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानच खरं रूप अखेर समोर आलंय. पाकिस्तानने इराणच्या लष्करी विमानांना आपला एक अत्यंत संवेदनशील हवाई तळ वापरण्याची परवानगी दिल्याचे वृत्त समोर आलंय. त्यामुळे पाकिस्तनाच्या मध्यस्थीच्या नाटकाला आता पूर्णविराम लागलाय. अमेरिकन अधिकाऱ्यांनी केलेल्या या धक्कादायक खुलाशांमुळे, प्रदेशात स्थिरता आणणारी शक्ती असल्याचा दावा करत असतानाच दोन्ही बाजू सांभाळणाऱ्या देशाचे चित्र समोर आले आहे. हे वृत्त अशा नाजूक वेळी समोर आलंय, जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प बुधवारी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत एका महत्त्वपूर्ण बैठकीसाठी बीजिंगमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. हैदराबादचा IPL मधील सर्वात लाजिरवाणा पराभव! आयपीएल 2026 मधील 56वा सामना पूर्णपणे एकतर्फी ठरला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम येथे झालेल्या या सामन्यात गुजरात टायटन्स ने सनरायझर्स हैदराबाद वर तब्बल 82 धावांनी दणदणीत विजय मिळवला. धावांच्या फरकाने मिळालेला हा गुजरातचा आयपीएल इतिहासातील सर्वात मोठा विजय ठरला आहे. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 168 धावा उभारल्या होत्या. प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबादचा संपूर्ण संघ अवघ्या 14.4 षटकांत 86 धावांवर गारद झाला. गुजरातच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच हैदराबादच्या फलंदाजांवर दबाव निर्माण केला आणि सामना एकहाती जिंकून दाखवला. या शानदार विजयासह गुजरात टायटन्स ने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. “मार खाण्याची कामं करू नका…”; सोनू निगम चाहत्यावर भडकला Top 10 News: सोनू निगम हे गाण्यासह त्यांच्या परखड भाष्यासाठीसुद्धा लोकप्रिय आहेत. सोनू निगम यांचा स्पष्टवक्तेपणा हादेखील चर्चेचा विषय ठरतो. यावेळी लाइव्ह कॉन्सर्टमध्ये घुसून कार्यक्रमामध्ये व्यत्यय आणणाऱ्या चाहत्याला सोनू निगमने चांगलेच फैलावर घेतले. मार खाण्याची कामं का करता, असं लिहीत सोनू निगमनं आपला रोष व्यक्त केला आहे.कोल्हापूरमध्ये गायक सोनू निगमचा लाइव्ह कॉन्सर्ट पार पडला. कॉन्सर्ट अगदी रंगात आलेला असताना एका चाहत्याने मात्र व्यत्यय आणला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करीत सोनूनं पुढच्या वेळेस असं केलं, तर वाचवणार नाही, असा इशारा दिला आहे.