राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून पटेल,तटकरेंची नावं गायब Top 10 News: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीवरुन मोठा राजकीय गोंधळ निर्माण झाल्याचे चित्र आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेल्या कार्यकारणीच्या यादीत प्रफुल पटेल , छगन भुजबळ , सुनील तटकरे यांची नावं नसल्यान अनेकांच्या भुवया उंचवल्या असून चर्चांना उधाण आलय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक आयोगाला राष्ट्रीय कार्यकारिणी आणि त्यांचे काम यासंदर्भात सविस्तर यादी 29 एप्रिलला दिल्याचे पत्र प्रसारमाध्यमांमध्ये व्हायरल होत आहे. या पत्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या सोबत जनरल सेक्रेटरी म्हणून पार्थ पवार आणि जय पवार यांचे सुद्धा नाव आहे. मात्र यामध्ये प्रफुल पटेल सुनील तटकरे या नेत्यांची नावे राष्ट्रीय कार्यकारणीमध्ये वगळण्यात आल्याचे या यादीमध्ये दिसत आहे. परंतु या यादीमध्ये तांत्रिक आणि क्लेरिकल चुका असून या दुरुस्त केल्या जातील असं सुनेत्रा पवारांनी म्हटलंय. लाडक्या बहिणींना ₹३००० एकत्र मिळणार ईकेवायसी प्रक्रिया संपल्यानंतर’लाडकी बहीण योजने’मध्ये पात्र आणि अपात्र महिलांबाबत मोठी अपडेट समोर आलीय. सरकारने केलेल्या कडक छाननीनंतर तब्बल ६६ लाख अर्ज बाद झाल्याची माहिती समोर आलीय. यामुळे राज्याच्या तिजोरीवर पडणारा १० हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त भार वाचलाय. आता 1 कोटी 77 लाख पात्र महिलांनाच लाभ मिळणार आहे. तर मार्च आणि एप्रिलचे हप्तेही याच आठवड्यात जमा होणार असल्याची माहिती समोर आलीय. ईकेवायीनंतर लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्जांची सखोल तपासणी करण्यात आली. त्यानंतर ६६ लाख अपात्र अर्ज कायमचे बाद करण्यात आलेत. आता राज्यातील केवळ १ कोटी ७७ लाख पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे समोर आले आहे. पारदर्शकतेसाठी राबवलेल्या ई-केवायसी प्रक्रियेमुळे मोठ्या प्रमाणावर होणारी गळती रोखण्यात सरकारला यश आले आहे. प्रियकरासाठी पतीला विजेचा शॉक, पत्नीनं रचला कट यवतमाळच्या कळंब तालुक्यातल्या पंगडी गावात पत्नीनं आपल्या प्रियकरासाठी थेट पतीला आयुष्यातून उठवण्याचा भयानक कट रचल्याचे धक्कादायक माहिती समोर आलीय. गजानन मोरे आणि कवडी मोरे या नवरा-बायकोच्या आयुष्यात विष्णू आत्रामची एण्ट्री झाली. विष्णू आणि कवडीनं गजाननचा काटा काढायचं ठरवलं, गजानन मोरे आपल्या घरात गाढ झोपेत असताना कवडी मोरेनं प्रियकर विष्णू आत्राम यांच्या सांगण्यावरून रात्री 2 वाजता विजेच्या वायरला अॅल्युमिनियमची तार जोडली आणि झोपलेल्या गजानन मोरे याला विजेचा शॉक दिला. अंगातून विजेचा प्रवाह जाताच गजानन यांना मोठा झटका बसला. सुदैवाने, या प्राणघातक हल्ल्यातून ते बचावले. मात्र, या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला. पत्नीने जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचं लक्षात येताच पोलिसांत तक्रार दिली. या दोघांना अटक करण्यात आलीय. काँग्रेसच्या बड्या नेत्याचा पुण्यात भीषण अपघात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अभय छाजेड यांच्या गाडीला काल रात्री पुण्याच्या जवळ भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आलीय. या अपघातात छाजेड यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झालीय. सध्या त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, ही घटना रात्री घडली. अभय छाजेड पुण्याच्या दिशेने येत होते. यावेळी पिरंगूट भागात चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्याने गाडी थेट बाजूच्या टेकडीला जाऊन धडकली. धडक इतकी जोरात होती की, यामध्ये कारचं मोठं नुकसान झालं आहे. सध्या छाजेड यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे. अभय छाजेड हे पुण्यातील काँग्रेसचे एक ज्येष्ठ आणि सक्रिय नेते आहेत. मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट उन्हाळा संपत आला असून पुढील 20 दिवसांत मान्सुनचे आगमन होण्याचा अंदाज आहे. मात्र, सध्याच्या कडक उन्हाळ्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांच्या पाणीपुरवठ्यावर होत आहे. मुंबई शहरातही शुक्रवार 15 मे 2029 पासून 10 टक्के पाणीकपात करण्यात येणार असून जलाशयांमधील पाणीसाठा घटल्याने खबरदारी म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. सर्व नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन देखील महापालिकेकडून करण्यात आलंय. भारतीय हवामान खात्याने पुढील वर्षी येणाऱ्या अल निनो व आयओडी बाबत वर्तवलेला अंदाजानुसार कमी मान्सून प्रमाण लक्षात घेता जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन यांच्या निर्देशानुसार मुंबई महानगरात येत्या शुक्रवारपासून 10 टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनान घेतलाय. मोदींच्या आवाहनानंतर 1 कोटी लोकांचा रोजगार धोक्यात? पुढील वर्षभर देशवासियांनी सोनं खरेदी करू नये, तसंच पेट्रोल डिझेलचा वापरही कमीत कमी करावा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. तसंच शाळांनीही ऑनलाईन वर्ग सुरु करावेत असंही नरेंद्र मोदी म्हणाले. सलग दोन दिवस नरेंद्र मोदींनी देशवासियांना आवाहन केल्याने विविध चर्चा रंगल्यात. नरेंद्र मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर देशात खळबळ उडाली आहे. ज्वेलरी असोसिएशनचे पदाधिकारी आज पीएमओतील अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत.दरम्यान , या आवाहनामुळं देशातील 1 कोटींहून अधिक लोकांच्या रोजगारावर परिणामाची भीतीही जीसेजीकडून यावेळी व्यक्त करण्यात आलीय. सराफांना भीती आहे की या आवाहनामुळे सोन्याच्या मागणीत मोठी घट होऊ शकते, ज्यामुळे रोजगार आणि व्यवसाय या दोन्हींवर परिणाम होईल. मोदींच्या विधानानंतर ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलने या आवाहनावर चिंता व्यक्त केलीय. PM मोदींच्या आवाहनानंतर केंद्र सरकारने दिली महत्वाची अपडेट पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून निर्माण झालेल्या जागतिक चिंतेच्या पार्श्वभूमीवर पंप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधनाचा काळजीपूर्वक वापर करण्याचे आवाहन केले होते त्यामुळे देशात एकच खळबळ उडाली होती. मात्र आता भारत सरकारने आपल्या नागरिकांना काहीसा दिलासा दिला आहे.सरकारने देशात कच्चे तेल, पेट्रोल- डिझेल आणि एलपीजीचा तुटवडा नाही आणि लोकांनी घाबरून इंधन खरेदी करण्याची गरज नाही, असे स्पष्टपणे सांगितले. तसेच भारताकडे तेल आणि वायूचा पुरेसा साठा असून सर्व तेल शुद्धीकरण कारखाने पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. जनतेला कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी सरकार पुरवठ्यांवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे काहीच कारण नसल्याचेही सांगण्यात आलंय. 19 राज्यांमध्ये मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याचा इशारा देशभरातील अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पाऊस आणि वादळांची शक्यता आहे. हवामान विभागाने आज उत्तर प्रदेश आणि बिहारसह 19 राज्यांसाठी पाऊस आणि वादळाचा इशारा जारी केलाय. यात जोरदार वारे ताशी 80 ते 85 किमी वेगाने वाहतील. दरम्यान, पूर्व भारतात विजांचा कडकडाट आणि वादळी पावसामुळे हाहाकार माजण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी हा विशेष इशारा आहे. दरम्यान, डोंगराळ राज्यांमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांनीही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. अनेक राज्यांमध्ये गारपिटीचा इशाराही देण्यात आला आहे. पश्चिम बंगाल आणि आसपासच्या भागांवर खालच्या ट्रोपोस्फियर स्तरावर एक चक्रीय वाऱ्यांची स्थिती आहे. दक्षिण आसाम आणि आसपासच्या भागांवर खालच्या ट्रोपोस्फियर स्तरावर आणखी एक चक्रीय वाऱ्यांची स्थिती आहे. दिल्लीच्या विजयाने दिग्गज संघांची झोप उडाली यपीएल (IPL) चा चालू हंगाम आता त्याच्या निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. प्रत्येक सामन्यानंतर गुणतालिकेत मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. नुकत्याच झालेल्या पंजाब किंग्स (PBKS) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यातील अटीतटीच्या लढतीने प्लेऑफच्या शर्यतीत मोठी खळबळ उडवून दिली. काही संघांचे स्थान जवळपास निश्चित झाले असले, तरी चौथ्या क्रमांकासाठी अजूनही काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार, RCB आणि SRH हे दोन संघ प्लेऑफसाठी प्रबळ दावेदार मानले जातायेत. आरसीबीने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर 95% शक्यता निर्माण केलीय. त्यांना आता केवळ उरलेल्या 3 पैकी 1 सामना जिंकणे आवश्यक आहे. दुसरीकडे, पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील हैदराबादचा संघ 94% शक्यतेसह दुसऱ्या स्थानी असून, त्यांनाही प्लेऑफचे तिकीट पक्के करण्यासाठी फक्त एका विजयाची प्रतीक्षा आहे. ‘गुल्लक’चा पाचवा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला लोकप्रिय आणि प्रदीर्घ काळ चालणाऱ्या ओटीटी सीरिजपैकी एक असलेल्या ‘गुल्लक’चे दरवाजे पाचव्या सीझनसाठी उघडत आहेत. ‘गुल्लक’ या OTT शोचा पाचवा सीझन लवकरच SonyLIV वर प्रदर्शित होणार आहे. या नवीन सीझनमध्ये एका विशेष पात्राचा समावेश असणार आहे. या नवीन सीझनमध्ये मिश्रा कुटुंबात एक परिचित पात्र पण नवीन चेहरा पाहायला मिळणार आहे. अभिनेता अनंत व्ही. जोशी ‘गुल्लक’च्या पाचव्या सीझनमध्ये आनंद ‘अन्नू मिश्रा’च्या भूमिकेत दिसणार आहे. ‘गुल्लक’ हा शो त्याच्या साधेपणासाठी, कौटुंबिक जिव्हाळ्यासाठी आणि दैनंदिन जीवनातील छोट्या-छोट्या प्रसंगांच्या वास्तववादी चित्रणासाठी प्रसिद्ध आहे. या सीझनमध्ये, मिश्रा कुटुंबाच्या घराचे दरवाजे पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी खुले होत आहेत.’गुल्लक 5′ लवकरच सोनी लिव्हवर प्रसारित होणार आहे.