राज्याला अवकाळीचा फटका Top 10 News: राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. काही भागात कडाक्याची उष्णता जाणवत आहे. तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे गेलाय. तर दुसरीकडे राज्याच्या काही भागात अवकाळी पावसानं हजेरी लावलीय. कोकणासह, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसानं झोडपून काढलंय. या पावसामुळं आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय . दरम्यान, रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसामुळं एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. तर संगमेश्वर तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाची जोरदार हजेरी लावली. पुणे बंगळुरु महामार्गाला कराड तालुक्यातील उंब्रज जवळ नदीचे स्वरूप आल्याच चित्र पाहायला मिळालं. साताऱ्यातील कराड व पाटण तालुक्याला आज पुन्हा अवकाळी पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे महामार्गाला अक्षरशः नदीचे स्वरूप मिळालं. पुणे-मुंबई प्रवासात सुप्रिया सुळेंच्या कारला धडक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. पुणे ते मुंबई महामार्गावर प्रवास करत असताना एका वाहनाने सुळे यांच्या कारला धडक दिली आहे. या घटनेनंतर सुप्रिया सुळे यांनी घडलेला प्रसंग सोशल मीडियावर शेअर केलाय. तसेच त्यांनी ज्या वाहनाने त्यांच्या कारला धडक दिली त्या वाहनाचा नंबर देखील शेअर केलाय. याविषयी बोलताना आज पुणे ते मुंबई प्रवास करत असताना, महामार्गावर एका या वाहनाने बेदरकारपणे गाडी चालवल्यामुळं माझ्या गाडीला बाजूने धडक दिल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली. हा एक अत्यंत वाईट अनुभव होता. सुदैवाने, आम्ही सर्वजण सुरक्षित आहेत अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. अशा घटना हा एक गंभीर इशारा असल्याचंही त्यांनी म्हटलंय. मतीन पटेल यांच्या घर आणि कार्यालयावर बुलडोझर? नाशिकच्या TCS कंपनीतील धर्मांतर प्रकरणातील मुख्य सूत्रधार निदा खानला आश्रय देणारे एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्यावरही सहआरोपी म्हणून कारवाई करण्यात येतीय. या प्रकरणात निदा खानला पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली होती. या प्रकरणात आता पटेल यांच्या घरावर आणि कार्यालयावर पालिकेने कारवाईची नोटिस चिकटवली आहे. त्यामुळे त्यांच्या घर आणि कार्यालयावर बुलडोझर फिरणार का ? असा सवाल केला जातोय. कारण मतीन यांच्या घरावर आणि कार्यालयावर छत्रपती संभाजीनगर महापालिकेने नोटीस चिटकवली आहे. नगरसेवक मतीन पटेल यांनी या नोटीसला तीन दिवसात समाधानकारक उत्तर न दिल्यास आता त्यांच्या घरावर बुलडोझर फिरणार असल्याच म्हटलं जातंय. त्यामुळे आता ही कारवाई करण्यात येणार का याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. अवघ्या एका आठवड्यात पाच वाघांचा मृत्यू मध्यप्रदेशातील ‘कान्हा’ व्याघ्र प्रकल्पात एकानंतर एक अशा पाच वाघांचा ‘केनाईन डिस्टेंपर वायरस’ म्हणजेच CDV मुळे मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालंय. 21 एप्रिल ते 28 एप्रिल दरम्यान टी -141 या वाघिणीसह तिच्या चार बछड्यांचे एका नंतर एक झालेले मृत्यू केनाईन डिस्टेंपर वायरसचा परिणाम असल्याच स्पष्ट झालंय. कान्हा व्याघ्र प्रकल्पातील अधिकाऱ्यांनी अशक्त होऊन मृत्युमुखी पडलेल्या वाघिणी आणि चारही बछड्यांचे नमुने जबलपूर येथील ‘स्कूल ऑफ वर्ल्ड लाइफ फॉरेन्सिक अँड हेल्थ’ या प्रयोगशाळेत पाठवले होते. प्रयोगशाळेने पाचही वाघांचा मृत्यू केनाईन डिस्टेंपर वायरसमुळे झाल्याचे प्रमाणित केलंय. भाजपा हा आपला पहिला शत्रू- ममता बॅनर्जी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी शनिवारी पश्चिम बंगालमधील सर्व विरोधी पक्षांना भाजपाविरुद्ध लढण्यासाठी एका संयुक्त व्यासपीठावर येण्याचं आवाहन केलंय. १५ वर्षांच्या सत्ताकाळानंतर ममता बॅनर्जी यांच्याकडून भाजपाने राज्याची सूत्रे हाती घेतली आहेत. माजी मुख्यमंत्र्यांनी भाजपला विरोध करणाऱ्या विद्यार्थी संघटना आणि स्वयंसेवी संस्थांनाही भाजपविरोधात एकत्र येण्याचे आवाहन केलंय. तसंच जर कोणत्याही राजकीय पक्षाला या संदर्भात चर्चा करायची असेल तर त्या चर्चेसाठी तयार आहेत. “शत्रूचा शत्रू आपला मित्र असा विचार करण्याची ही वेळ नाही, भाजपा हा आपला पहिला शत्रू आहे”, असं टीएमसी नेत्या म्हणाल्या. यंदा भारतात मान्सून वेळेवर दाखल होणार Top 10 News: यंदा भारतात मान्सून वेळेवर दाखल होईल, असा अंदाज अनेक खासगी हवामान संस्थाकडून व्यक्त केला जात आहे. सध्या तामिळनाडू आणि केरळमध्ये मेघगर्जनेसह वादळी पावसाची नोंद होत असून दक्षिण भारतात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. मे महिन्याच्या सुरुवातीला देशात अपेक्षेपेक्षा थंड वातावरण नोंदवले गेले. नैऋत्य मान्सूनच्या आगमनाचे संकेत आता स्पष्ट होत असून मान्सून भारतात वेळेत दाखल होण्याचा अंदाज आहे. ऑस्ट्रेलियाकडूनही त्यादृष्टीने संकेत देण्यात आलेत. सध्या देशातील बहुतांश भागात पश्चिमी वादळाच्या प्रभावामुळे पावसाची नोंद होतीय. राज्यातही अनेक भागात पावसाळी हवामान आहे. त्यामुळे सध्या कमाल तापमानात काहीशी घट नोंदली जात असल्याने नागरिकांना तीव्र उन्हापासून तात्पुरता दिलासा मिळालाय . इराणच्या दाव्यामुळे अमेरिकेचे वाढले टेन्शन अमेरिका आणि इराणमधील संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. एकीकडे दोन्ही देशांकडून युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आहे. परंतु तरी देखील अजूनही स्ट्रेट ऑफ होर्मूजमध्ये तणाव कायम आहे. याचदरम्यान आता एक मोठी बातमी समोर आलीय. ती म्हणजे इराणने अमेरिकेला मोठा इशारा देत आम्ही हार माणणार नाही असं म्हटलंय. तसेच इराणकडून मोठा दावा देखील करण्यात आला आहे. इराणच्या या दाव्यामुळे अमेरिकेचं टेन्शन चांगलंच वाढलं आहे. आमची ताकद पूर्वीच्या तुलनेत आता अधिक वाढली असून, आम्ही आमच्या मिसाईल भंडारात तब्बल 120 टक्क्यांची वाढ केल्याचं इराणने म्हटलंय. इराणच्या या नव्या दाव्यामुळे अमेरिकेचं तर टेन्शन वाढलच आहे, मात्र इस्त्रायलसाठी देखील मोठा धोका निर्माण झाला आहे.इराणचे परराष्ट्रमंत्री सैय्यद अब्बास अराघची यांनी सोशल मीडियावरून हा दावा केलाय. 2 माजी संरक्षण मंत्र्यांना मृत्यूदंडाची शिक्षा चीनमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्यांची आता खैर नाही, हेच जिनपिंग यांनी जगाला दाखवून दिलंय. कारण सामान्य नागरिक असो किंवा मंत्री. तिथं भ्रष्टांना संपवण्यासाठी फक्त फाशीच देण्यात येणार आहे. चीनने भ्रष्टाचारी माजी मंत्र्यांना दिलेल्या कठोर शिक्षेनं जगाचं लक्ष वेधून घेतलंय. चीनमध्ये भ्रष्टाचाराची शिक्षा फक्त फाशीच आहे. याच आरोपाखाली माजी संरक्षण मंत्री वेई फेंगहे आणि ली शांगफू यांना फाशीची शिक्षा देण्यात आलीय. त्यांच्यावर पदाचा गैरवापर करत लाच घेतल्याचा आरोप करण्यात आलाय. लष्करी न्यायालयाने दोघांनाही दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावलीय.यासोबतच त्यांचे सर्व राजकीय अधिकार रद्द, खासगी मालमत्ताही जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. गुजरातची थेट दुसऱ्या स्थानी झेप शुभमन गिलच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सला ७७ धावांनी पराभव करत प्लेऑफकडे वाटचाल केली. राजस्थानच्या पराभवानंतर गुणतालिकेत मोठी उलथापालथ झाली आहे. गुजरातने राजस्थानटा पराभव करत गुणतालिकेत थेट दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. गुजरातच्या विजयाचा ३ संघाना मोठा फटका बसलाय. राजस्थान, पंजाब आणि आरसीबी या तिन्ही संघ गुणतालिकेतील क्रमवारीत घसरलेत. गुजरातकडून पराभव झाल्यानंतर राजस्थानचा संघ गुणतालिकेत घसरला आहेच. त्याशिवाय पंजाब आणि आरसीबी या संघालाही फटका बसला आहे. पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर हे संघही गुणतालिकेत प्रत्येकी एका स्थानाने खाली घसरले आहेत. सनरायझर्स हैदराबाद गुणतालिकेत अव्वल स्थानावर कायम आहे. पण गुजरातचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर पोहचलाय. इरफान-विद्याची शोर्टफिल्म 25 वर्षांनी अखेर यूट्यूबवर Top 10 News: अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात कायमचं घर करणाऱ्या इरफान खान आणि अभिनेत्री विद्या बालन यांची तब्बल 25 वर्षांपूर्वी शूट झालेली ‘द लास्ट टेनंट’ ही शॉर्ट फिल्म अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. इरफान यांच्या सहाव्या पुण्यतिथीनिमित्त ही फिल्म यूट्यूबवर रिलीज करण्यात आली आणि क्षणार्धात चर्चेचा विषय ठरलीय. इरफान खान यांच्या आठवणींनी पुन्हा एकदा चाहत्यांचे डोळे पाणावले आहेत. विशेष म्हणजे, ही फिल्म त्या काळात शूट झाली होती जेव्हा विद्या बालन आणि इरफान खान दोघेही त्यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात होते. पण नशिबाने वेगळंच काही ठरवलं होतं. ओरिजिनल फुटेज हरवल्यामुळे हा चित्रपट कधीच रिलीज होऊ शकला नाही. 25 वर्षांनी जेव्हा ही फिल्म पुन्हा समोर आली, तेव्हा केवळ चाहतेच नाही तर स्वतः विद्या बालनही भावूक झाली.