Indurikar Maharaj: इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या लग्नात भलतीच घटना; वऱ्हाडी बनून आले अन्…, दोघांना बेड्या
Indurikar Maharaj: हा विवाह सोहळा केवळ चोरीमुळेच नाही, तर त्यातील भव्यतेमुळेही चर्चेत आहे. या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्र्यांनी हजेरी लावून वधू-वरांना आशीर्वाद दिले.

Indurikar Maharaj: प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांच्या कन्येचा विवाह सोहळा संगमनेरमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडला. मात्र, या शाही सोहळ्याला चोरीच्या घटनेने गालबोट लागले आहे. लग्नाच्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी दोन महिलांच्या गळ्यातील तब्बल ६ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. याप्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवत दोन सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत.
गर्दीचा फायदा घेत साधला डाव –
मिळालेल्या माहितीनुसार, इंदुरीकर महाराजांची मुलगी ज्ञानेश्वरी आणि साहिल यांचा विवाह सोहळा रविवारी पार पडला. या सोहळ्यासाठी राजकीय नेत्यांसह मोठी गर्दी जमली होती. याच गर्दीत सामील होऊन चोरट्यांनी दोन महिलांचे दागिने हिसकावले. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
चोरटे असे अडकले जाळ्यात –
स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळाली होती की, चोरीच्या दागिन्यांची वाटणी करण्यासाठी दोन तरुण दुचाकीवरून ममदापूर फाटा येथे येणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचला आणि सागर सुरेश कांबळे व बबलू उर्फ अब्दुल इब्राहिम पिंजारी (दोघे रा. श्रीरामपूर) यांना ताब्यात घेतले. (Indurikar Maharaj)
पोलिसी खाक्या दाखवताच कबुली –
आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, या चोरीत आतिक आयुब उर्फ आरीफ शेख आणि सनी विलास यांचाही सहभाग असल्याचे सांगितले. पोलिसांनी आरोपींकडून ११.५ ग्रॅम सोन्याचे दागिने, दोन मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त केला आहे. पकडलेले दोन्ही आरोपी हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत.
शाही विवाहाची राज्यभरात चर्चा –
Indurikar Maharaj: इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या लग्नात भलतीच घटना; वऱ्हाडी बनून आले अन्…, दोघांना बेड्या
हा विवाह सोहळा केवळ चोरीमुळेच नाही, तर त्यातील भव्यतेमुळेही चर्चेत आहे. या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्र्यांनी हजेरी लावून वधू-वरांना आशीर्वाद दिले. भव्य मंडप, आकर्षक सजावट आणि मान्यवरांची मांदियाळी यामुळे हा विवाह सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.





