Rohit Pawar : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा फोडाफोडीच्या राजकारणाची जोरदार चर्चा रंगली आहे. नुकतीच उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे आठ खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणार असल्याच्या वावड्या उठवण्यात आल्या. एका वृत्तपत्राने थेट नाव घेत शिंदेंसोबत संबंधित खासदारांची ठाण्यात गुप्त बैठक पार पडली असल्याची बातमी दिली. यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. यानंतर ठाकरे आणि शिंदे सेनेच्या नेत्यांनी या वृत्त निराधार असल्याचे सांगितले. दुसरीकडे भाजपकडून राजकीय खेळी खेळली जात असल्याचे बोलले जात आहे. भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण समोर आल्यानंतर सत्ताधारी पक्षातील अनेक बड्या नेत्यांचे खरातसोबतचे फोटो समोर आले होते. त्यामुळे खरातला राजकीय आसरा असल्याची चर्चा रंगली होती. या प्रकरणावर भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हीच खरातचा भांडफोड केल्याची टिप्पणी केली होती. या प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष आणि राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकरांना दोन्ही अत्यंत महत्वाच्या पदांवरून पायउतार व्हावे लागले. या प्रकरणाची सखोल चौकशी एसआयटीकडून सुरू आहे. या सगळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एक्सवरुन लक्ष वेधून घेणारे ट्वीट केले आहे. रोहित पवारांनी ट्वीटमध्ये पुढच्या महिन्याच्या शेवटपर्यंत सत्तेतल्या मोठ्या पक्षाकडून सत्तेतल्या त्यांच्या मित्रांचीच शिकार केली जाणार असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. तसेच महाराष्ट्राला काळिमा फासणारे भोंदू खरात प्रकरण ही फक्त सुरूवात आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. यानंतर राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले असून, रोहित पवारांच्या ट्वीटवरुन विविध तर्क वितर्क लावले जात आहे. त्यांनी मित्रपक्षांनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. भाजपचे सत्तेतले मित्रपक्ष विरोधी पक्षाचे आमदार खासदार फोडणार असल्याच्या बातम्या बघितल्या, परंतु वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे, पुढच्या महिन्याच्या शेवटपर्यंत सत्तेतल्या मोठ्या पक्षाकडून सत्तेतल्या त्यांच्या मित्रांचीच शिकार केली जाणार असल्याची पक्की माहिती आहे. महाराष्ट्राला… — Rohit Pawar (@RRPSpeaks) April 12, 2026 नेमकं काय म्हणाले रोहित पवार? भाजपचे सत्तेतले मित्रपक्ष विरोधी पक्षाचे आमदार खासदार फोडणार असल्याच्या बातम्या बघितल्या, परंतु वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे, पुढच्या महिन्याच्या शेवटपर्यंत सत्तेतल्या मोठ्या पक्षाकडून सत्तेतल्या त्यांच्या मित्रांचीच शिकार केली जाणार असल्याची पक्की माहिती आहे. महाराष्ट्राला काळिमा फासणारे भोंदू खरात प्रकरण असंच बाहेर आलेलं नाही तर ठरवून आणलं गेलं असून ही फक्त सुरुवात आहे. आज भाजप मित्रपक्षांप्रती जरी ‘ए दोस्ती हम नही छोडेंगे’ ची भावना दाखवत असले तरी उद्या मित्रपक्षांची भावना भाजपाबाबत “जा बेवफा जा हमे…” याहून वेगळी असणार नाही हे नक्की आहे. त्यामुळे आपलीच भाजपकडून शिकार होऊ नये यासाठी मित्रपक्षांनी अधिक काळजी घेणंच उचित राहील. हेही वाचा : Shilpa Shetty : सीन सुरू झाला अन्…शिल्पा शेट्टीसोबत घडली होती भयंकर घटना; मुलाखतीत केला खुलासा