Ncp Merger News : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या हालचाली सुरू झाल्या असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा एकदा जोर आला आहे. या पार्श्वभूमीवर मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. माध्यमांशी बोलताना सुनील शेळके यांनी स्पष्ट संकेत दिले की, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष वाढत असेल, तर त्यांना सर्व दरवाजे खुले आहेत. त्यांनी दोन्ही गटांनी एकत्र येण्याची गरज अधोरेखित करत सध्याच्या राजकीय परिस्थितीत एकसंघ होणं पक्षाच्या भविष्यासाठी महत्त्वाचं असल्याचं सांगितलं. शेळके यांनी सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत, “त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची प्रगती होत असेल, तर तो आमच्यासाठी अभिमानाचा विषय आहे,” असे म्हटले. त्याचवेळी त्यांनी स्पष्ट इशाराही दिला की, जर कुणाला हे नेतृत्व मान्य नसेल, तर त्यांनी पक्ष सोडण्याचा पर्याय निवडावा. दरम्यान, अजित पवार यांच्या निधनामुळे पक्षात निर्माण झालेली पोकळी अजूनही जाणवत असल्याचे शेळके यांनी नमूद केले. त्यांनी अजितदादांच्या कार्याचा उल्लेख करत त्यांच्या योगदानाची आठवणही करून दिली. राज्यात बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जर हे विलीनीकरण झाले, तर त्याचा थेट परिणाम राज्यातील सत्तासमीकरणांवर होण्याची शक्यता असून आगामी निवडणुकांपूर्वी मोठा राजकीय बदल घडू शकतो.