Sunetra Pawar: बारामतीत ‘सुनेत्रा पवार मुख्यमंत्री’चे बॅनर; जय पवारांच्या वक्तव्यानंतर राजकीय चर्चांना उधाण
Sunetra Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) युवा नेते जय पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत केलेल्या विधानानंतर बारामतीत बॅनरबाजी सुरू झाली आहे. मात्र, भाजपने यावर आपली रोखठोक भूमिका मांडत २०२९ मध्ये देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील, असा दावा केला आहे.

Sunetra Pawar: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या २०२९ च्या मुख्यमंत्रीपदावरून जोरदार चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) युवा नेते जय पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत केलेल्या विधानानंतर बारामतीत बॅनरबाजी सुरू झाली आहे. मात्र, भाजपने यावर आपली रोखठोक भूमिका मांडत २०२९ मध्ये देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील, असा दावा केला आहे.
जय पवारांचे विधान आणि बारामतीतील फ्लेक्स –
अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांनी नुकतेच एक सूचक विधान केले. ते म्हणाले, “बारामतीकरांची इच्छा होती की दादांनी मुख्यमंत्री व्हावे. आता सुनेत्रा वहिनी देखील खूप कष्ट घेत आहेत. २०२९ ला बारामती विधानसभेसाठी वहिनीच उभ्या राहतील आणि त्यांनी राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवावे, अशी आमची सर्वांची आशा आहे.”
या विधानानंतर बारामतीत सुनेत्रा पवारांचे बॅनर झळकले आहे. ‘होय मुख्यमंत्रीच! महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून उभा महाराष्ट्र तुमच्याकडे पाहतोय’ असा मजकूर या बॅनरवर छापण्यात आला आहे. या बॅनरबाजीमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
“मुख्यमंत्री व्हायला जनाधार लागतो” – जयकुमार गोरेंचा पलटवार
जय पवार यांच्या विधानावर भाजप नेते आणि मंत्री जयकुमार गोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी जय पवारांचे नाव न घेता त्यांचे ‘कान टोचले’ आहेत. “प्रत्येक कार्यकर्त्याला आपला नेता मोठा व्हावा असे वाटते, पण मुख्यमंत्री होण्यासाठी आमदारांचे संख्याबळ आणि मोठा पाठिंबा लागतो,” असे गोरे म्हणाले. आजची राजकीय स्थिती पाहता २०२९ मध्ये देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, बारामतीतून सुनेत्रा पवारांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून चर्चा सुरू झाली असली, तरी महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या भाजपने मात्र २०२९ साठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत आपला इरादा स्पष्ट केला आहे. आता हा अंतर्गत कलगीतुरा आगामी काळात काय वळण घेतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.





