SIR Controversy : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना मोठा दणका; सत्तेतील मंत्र्यांनीही वाढवला दबाव, म्हणाले – ‘जनतेचे संशय दूर करा’
SIR Controversy : SIR वरील वादात केंद्रीय मंत्री चिराग पासवान आणि उपेंद्र कुशवाह यांनी निवडणूक आयोगाकडे जनतेचा संभ्रम दूर करण्यासाठी स्पष्टीकरण देण्याची मागणी केली. विरोधकांच्या मागण्याही जाणून घ्या.

SIR Controversy : मतदार यादीच्या विशेष गहन पुनरावलोकनाबाबत (SIR) सुरू असलेल्या वादाला आता नवे वळण मिळाले आहे. एनडीएतील घटक पक्षांचे नेते आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान तसेच राष्ट्रीय लोक मोर्चाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांनी निवडणूक आयोगाने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली आहे. निवडणूक प्रक्रियेबाबत जनतेच्या मनात संशय निर्माण होणे योग्य नाही, असे पासवान यांनी म्हटले आहे. तर SIR वरील वादामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला असून आयोगाने तातडीने वस्तुस्थिती स्पष्ट करावी, असे कुशवाह यांनी म्हटले आहे.
चिराग पासवान नेमके काय म्हणाले?
केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) अध्यक्ष चिराग पासवान यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी या संपूर्ण प्रकरणावर ठामपणे भूमिका मांडावी, असे म्हटले. निवडणूक आयोग ही स्वतंत्र घटनात्मक संस्था आहे. त्यामुळे आयोगावर प्रश्न उपस्थित होत असतील, तर त्याचे स्पष्टीकरण देण्याची जबाबदारीही आयोगाचीच आहे, असे त्यांनी सांगितले.
विरोधकांना उत्तर देण्यासाठी नव्हे, तर सामान्य जनतेच्या मनात निवडणूक प्रक्रियेबाबत कोणताही संशय राहू नये, यासाठी आयोगाने आपली भूमिका स्पष्ट करावी, असे पासवान यांनी म्हटले.
एस आइ आर से संबंधित विवाद पर जनता में काफी उलझन की स्थिति पैदा हो गई है। विषय को एड्रेस करने की जरूरत है। कंफ्यूजन दूर करने हेतु चुनाव आयोग के द्वारा अविलंब सही स्थिति पर स्पष्टीकरण आना चाहिए। @ECISVEEP
— Upendra Kushwaha (@UpendraKushRLM) September 25, 2026
उपेंद्र कुशवाह यांचीही स्पष्टतेची मागणी
एनडीएतील आणखी एक घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय लोक मोर्चाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांनीही शुक्रवारी SIR वरील वादावर निवडणूक आयोगाने तातडीने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली. या विषयामुळे जनतेमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला असून योग्य वस्तुस्थिती आयोगाने स्पष्ट करणे गरजेचे आहे, असे त्यांनी म्हटले.
कुशवाह यांनी यापूर्वी SIR वरून विरोधकांकडून उपस्थित केलेले प्रश्न फेटाळले होते. बिहार विधानसभा निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात मतदारांची नावे वगळली गेली असती, तर संबंधित लोक रस्त्यावर उतरले असते, असे त्यांनी म्हटले होते. आता मात्र त्यांनी आयोगाकडून या वादावर स्पष्टता मागितली आहे.
#WATCH | Patna, Bihar | Reacting to Indian Express report on 2 ECs objecting to discrepancies in SIR process, RLM President Upendra Kushwaha says, “Whatever the opposition is saying regarding this matter is completely inappropriate. Such language should not be used. Differences of opinion are natural; they can occur. Those with the authority to do so should look into this matter.”
— ANI (@ANI) September 24, 2026
14 आक्षेपांमुळे वादाला वेग
‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी गेल्या 10 महिन्यांत आयोगाच्या काही निर्णयांवर किमान 14 वेळा लेखी आक्षेप नोंदवले. नवीन मतदारांची नोंदणी, मतदारांची नावे वगळणे किंवा पुन्हा समाविष्ट करणे, मतदार यादीतील माहिती आणि निवडणूक आयोगाच्या डिजिटल व्यवस्थेशी संबंधित मुद्द्यांवर हे आक्षेप असल्याचे वृत्त आहे.
विरोधकांची मागणी काय?
या वृत्तानंतर विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. काँग्रेसने शुक्रवारी देशातील विविध ठिकाणी आंदोलनही केले.
काँग्रेससह काही विरोधी पक्षांनी SIR थांबवण्याची आणि मतदार यादीतील बदलांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि आम आदमी पक्षाकडूनही ज्ञानेश कुमार यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी SIR तातडीने थांबवून निवडणूक आयोगाच्या कामकाजाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.
निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
दरम्यान, निवडणूक आयोगाने या आरोपांमध्ये अंतिम निर्णयांबाबत मतभेद असल्याचे नाकारले आहे. आयोगाच्या म्हणण्यानुसार, एखाद्या संस्थेत चर्चा, प्रश्न किंवा वेगवेगळी मते मांडली जाणे ही सामान्य प्रक्रिया आहे. SIRसह आयोगाचे अंतिम निर्णय तिन्ही निवडणूक आयुक्तांच्या संमतीने घेण्यात आल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
त्यामुळे एका बाजूला विरोधकांकडून आयोगाच्या कामकाजाची चौकशी आणि SIR थांबवण्याची मागणी होत असताना, दुसरीकडे एनडीएतील चिराग पासवान आणि उपेंद्र कुशवाह यांच्याकडूनही जनतेच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी आयोगाने स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी पुढे आली आहे.





