Sanjay Raut: राहुल गांधी हेच देशाचे नेते – संजय राऊत
Sanjay Raut:

भाजपा सत्तेच्या बळावर दादागिरी करणारा डरपोक लोकांचा पक्ष
Sanjay Raut: राहुल गांधी हे देशाचे नेते आणि विरोधी पक्षनेते आहेत. भविष्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्यासमोर विरोधी पक्षात बसावे लागणार असल्याचे प्रतिपादन शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यावर पोलिसांनी लादलेल्या अटींवरून त्यांनी भाजप सरकारवर निशाणा साधत, हे सरकार राहुल गांधींना घाबरले असून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. भाजपा सत्तेच्या बळावर दादागिरी करणारा डरपोक लोकांचा पक्ष असून सत्ता जाताच ९० टक्के नेते बिळात जातील, असा टोलाही राऊत यांनी लगावला.
राऊत म्हणाले, राहुल गांधींच्या लोकप्रिय कार्यक्रमांना भाजप घाबरत असून, पैसे देऊन गर्दी करण्याची गरज मोदी-शहांना लागते, काँग्रेसला नाही. राहुल गांधींचा कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न म्हणजे दहशतवाद, शुद्ध पळपुटेपणा आहे. स्वातंत्र्य चळवळीचा वारसा असलेली काँग्रेस अशा गुंडगिरीला कधीही घाबरणार नाही.
सप्टेंबरनंतर या सरकारच्या पडझडीला सुरुवात होईल. स्वातंत्र्यलढ्याशी संबंध नसलेल्यांनी वंदे मातरमची उठाठेव करू नये. जे वंदे मातरम म्हणत फासावर गेले, त्यांच्याशी भाजपचा काही संबंध नाही.
बेरोजगारी आणि महागाई हाच खरा युवा की आवाज असल्याचे सांगत त्यांनी रोहित पवारांनी लावलेल्या फ्लेक्सचे कौतुक केले. एबीव्हीपीने गुंडगिरी करण्याऐवजी निकृष्ट पोषण आहाराविरोधात आवाज उठवावा, असा सल्ला देत पोलिसांच्या मदतीने चालणारी भाजपची गुंडगिरी भविष्यात मोडून काढली जाईल, असेही ते म्हणाले.
किती काळ पालख्या व्हायच्या?
अजितदादा हे स्वाभिमानी होते, भाजप नेत्यांकडून वाढत्या दबावामुळेच दादांना नाईलाजास्तव महायुतीत जावे लागले. अन्यथा दादांनी शरद पवारांचा अशाप्रकारे विश्वासघात केला नसता, हा विश्वास असल्याचे राऊत यांनी सांगितले. पुणे महापालिकेत राष्ट्रवादी काॅग्रेसच्या नगरसेवकांचा निधी शुन्य होत असेल तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी किंवा पार्थ पवारांनी आता स्पष्ट बोलले पाहिजे. त्यांनी आणखी किती काळ भाजपच्या पालख्या वाहायच्या, असे सांगत राज्याचे नुकसान करणाऱ्या भाजपला सत्तेतून हुसकावून लावण्याचा इशाराही त्यांनी दिला.





