Political News : धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गटाचे) ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि आमदार तानाजी सावंत यांच्या कुटुंबात राजकीय दरी निर्माण होण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत. आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी स्वतंत्र मोर्चेबांधणी सुरू केल्याने कुटुंबातील मतभेद आता उघड झाले आहेत. धनंजय सावंत यांनी स्वतंत्रपणे कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. या बैठकीसाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर आमदार तानाजी सावंत यांचा फोटो किंवा उल्लेख कुठेही नसल्याने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. हे संकेत स्पष्टपणे सांगतात की, धनंजय सावंत आता स्वतंत्र दिशेने जाण्याच्या तयारीत आहेत आणि कुटुंबात वेगळी चूल मांडण्याची शक्यता वाढली आहे. धनंजय सावंत भाजपच्या संपर्कात? पक्ष बदलण्याची चर्चा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, आमदार तानाजी सावंत सध्या भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेत असताना, त्यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या हालचाली मात्र भाजपच्या जवळ जाणाऱ्या दिसत आहेत. धनंजय सावंत नेमके कोणत्या पक्षाकडून किंवा स्वतंत्रपणे जिल्हा परिषद निवडणूक लढवणार, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. तरीही त्यांच्या स्वतंत्र बैठका आणि हालचालींमुळे शिवसेना (शिंदे गट) च्या गोटात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. तानाजी सावंत यांच्या अडचणी वाढल्या तानाजी सावंत यांच्या राजकीय अडचणी यापूर्वीच वाढल्या होत्या. पुणे महापालिका निवडणुकीत त्यांच्या मुलाचा पराभव झाला होता. आता त्यात कुटुंबातीलच सदस्यांकडून हल्लाबोल सुरू झाला आहे. धनंजय सावंत यांच्याबरोबरच तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत आणि दुसरा पुतणे पृथ्वीराज सावंत यांनीही त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ‘भावाने माझा पक्षप्रवेश थांबवला’ सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांचा भाजप प्रवेश अनेक दिवसांपासून रखडला आहे. हे रखडण्यामागचे खरे कारण आता स्वतः शिवाजीराव सावंत यांनीच जाहीर केले आहे. एका मेळाव्यात त्यांनी थेट सांगितले, “माझा भाऊ तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्र्यांना घेऊ नका असं सांगून माझा पक्षप्रवेश थांबवला. कुटुंबातील दुसरा कोणी राजकारणात पुढे येऊ नये असा त्यांचा डाव आहे. भावाला कुणाची तरी नजर लागली आहे.” या वक्तव्याने सावंत कुटुंबातील अंतर्गत संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. आता काका विरुद्ध पुतणे आणि भाऊ असा स्पष्ट राजकीय संघर्ष जिल्ह्यातील राजकारणात दिसू लागला आहे. धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीत सावंत कुटुंबातील हा राजकीय पेच काय वळण घेणार, धनंजय सावंत आणि इतर सदस्य नेमका कोणता निर्णय घेणार आणि तानाजी सावंत यांची शिवसेना (शिंदे गट) मधील स्थिती काय राहणार, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे आणि महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.