MLC Election 2026 : राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता राज्यात विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी लवकरच निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. या जागांचा कार्यकाळ 13 मे 2026 रोजी संपत असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागांसाठी चुरस रंगण्याची चिन्हे आहेत. विधानसभेतील सध्याच्या संख्याबळानुसार, नऊपैकी पाच जागा भाजप, दोन जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला, एक जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला एक जागा मिळू शकते. यामुळे विशेषतः शिंदे गटात दोन जागांसाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा कार्यकाळ संपत असल्याने त्यांचे नाव पुन्हा चर्चेत आहे. त्यांच्यासह शितल म्हात्रे, शायना एनसी, अभिजित अडसूळ, भाऊसाहेब चौधरी आणि पूर्वेश सरनाईक या नावांची चर्चा रंगली आहे. यामध्ये एका महिलेला संधी दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या नऊ जागांसाठी आमदारांमधून निवडणूक होणार असून एका उमेदवाराला विजयी होण्यासाठी सुमारे 28 आमदारांचे समर्थन आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षासाठी गणित महत्त्वाचे ठरणार आहे. हेही वाचा – Shivsena: शिवसेना शिंदे गटातून ‘या’ नेत्याची हकालपट्टी; राजकीय वर्तुळात खळबळ, जाणून घ्या कारण या निवडणुकीत कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या सदस्यांमध्ये भाजपचे रणजितसिंह मोहिते पाटील, संदीप जोशी, दादाराव केचे, संजय केनेकर, शिंदे गटाच्या नीलम गोऱ्हे, अजित पवार गटाचे अमोल मिटकरी, शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे, ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे राजेश राठोड यांचा समावेश आहे. यापैकी सहा सदस्यांनी जवळपास सहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे, तर भाजपच्या तीन सदस्यांना केवळ दीड वर्ष काम करण्याची संधी मिळाली. भाजपकडूनही संभाव्य उमेदवारांची चर्चा सुरू झाली असून माजी आमदार राम सातपुते, माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, प्रवक्ते केशव उपाध्ये आणि माधवी वैद्य यांची नावे पुढे येत आहेत. दरम्यान, राज्यसभा निवडणुकीत अनपेक्षितरित्या ज्योती वाघमारे यांना उमेदवारी देत धक्कातंत्र वापरण्यात आले होते. त्यामुळे विधानपरिषद निवडणुकीतही एकनाथ शिंदे पुन्हा एखाद्या नव्या चेहऱ्याला संधी देत राजकीय धक्का देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकूणच, एप्रिलमध्ये निवडणुकीची घोषणा अपेक्षित असून, त्याआधीच सर्व पक्षांतर्गत हालचालींना वेग आला आहे. विधानपरिषद निवडणूक राज्याच्या राजकारणातील पुढील समीकरणे ठरवणारी ठरणार आहे. विधानपरिषद निवडणूक कशी होते? मतांचे गणित कसे ठरते? महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणूक ही अप्रत्यक्ष पद्धतीने होते. विधानसभेतील आमदार (MLA) मतदान करून सदस्यांची निवड करतात. या निवडणुकीत प्रमाण प्रतिनिधित्व पद्धती (Proportional Representation) आणि एकच हस्तांतरणीय मत (Single Transferable Vote – STV) प्रणाली वापरली जाते. मतदार म्हणजे सर्व आमदार आपल्या पसंतीनुसार उमेदवारांना क्रमांक देतात (१, २, ३…). मतमोजणी करताना प्रथम पसंतीच्या मतांना प्राधान्य दिले जाते. एखाद्या उमेदवाराला निवडून येण्यासाठी ठराविक “कोटा” पूर्ण करावा लागतो. हा कोटा साधारणपणे असा ठरतो: कोटा = (एकूण वैध मते ÷ (जागा + 1)) + 1 उदाहरणार्थ, 288 आमदार आणि 9 जागा असतील तर प्रत्येक उमेदवाराला सुमारे 28-29 मतांची गरज पडते. एखाद्या उमेदवाराला आवश्यक कोटा मिळाला की तो विजयी ठरतो. जास्तीची मते पुढील पसंतीनुसार इतर उमेदवारांकडे हस्तांतरित केली जातात. जर कोणी कोटा पूर्ण करू शकला नाही, तर सर्वात कमी मते असलेला उमेदवार बाद होतो आणि त्याची मते पुढील पसंतीनुसार वाटली जातात. ही प्रक्रिया सर्व जागा भरल्या जाईपर्यंत सुरू राहते. म्हणूनच, पक्षांचे संख्याबळ, क्रॉस-व्होटिंग आणि राजकीय रणनीती या निवडणुकीत निर्णायक ठरतात.