Suryakant More: राष्ट्रवादीच्या सूर्यकांत मोरेंना 30 दिवस कारावासाची शिफारस, काय आहे प्रकरण?
Suryakant More: नोव्हेंबर २०२५ मध्ये जामखेड नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारसभेत सूर्यकांत मोरे यांनी विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधाने केली होती.

Suryakant More: महाराष्ट्र विधान परिषदेच्या विशेषाधिकार समितीने मंगळवारी आपला अहवाल सादर करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे अहमदनगर जिल्ह्यातील नेते सूर्यकांत मोरे यांना ३० दिवसांच्या दिवाणी कारावासाची शिफारस केली आहे. विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्याविरोधात निवडणूक प्रचारसभेत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे ही कारवाई सुचवण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
नोव्हेंबर २०२५ मध्ये जामखेड नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारसभेत सूर्यकांत मोरे यांनी विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधाने केली होती. दि. २३ नोव्हेंबर २०२५ रोजी जामखेड येथील सभेत मोरे म्हणाले होते, “लाल रंगाच्या बिल्ल्याला कोण विचारतो… विधान परिषद सभापतींकडे पंचायत समिती सभापतींइतकेही अधिकार नाहीत. सभापतींचे काम केवळ मते मोजण्यापुरतेच आहे… विधान परिषदेचा लाल रंग हा दुष्काळाचे प्रतीक आहे.”
हिवाळी अधिवेशनात उपस्थित झाला होता प्रश्न –
या वक्तव्यानंतर भाजपचे विधान परिषद सदस्य प्रवीण दरेकर यांनी हिवाळी अधिवेशनात मोरे यांच्याविरोधात विशेषाधिकार भंग प्रस्ताव दाखल केला होता. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी हा प्रस्ताव स्वीकारून मोरे यांच्याविरोधात चौकशी करण्याचे तसेच त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते.
हेही वाचा -व्यावसायिक गॅस पुरवठा बंद; 48 तासांत निम्मी मुंबई उपाशी राहणार?
अहवाल सादर –
मंगळवारी विशेषाधिकार समितीचे अध्यक्ष व भाजप आमदार प्रसाद लाड यांनी हा अहवाल परिषदेत सादर केला. त्यावेळी सभापती राम शिंदे अध्यक्षस्थानी होते. त्यांनी अहवाल सादर झाल्याची घोषणा परिषदेत केली. उल्लेखनीय म्हणजे सूर्यकांत मोरे हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) चे स्थानिक आमदार रोहित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात.




