Manoj jarange protest : मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी निघाले अन् वाटेतच काळाचा घाला; मराठा आरक्षण आंदोलनातील कार्यकर्त्यांमध्ये शोककळा
Manoj jarange protest : मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी निघालेल्या बीडच्या सुग्रीव बापू शिंदे यांचा गेवराई परिसरात हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला.

Manoj jarange protest : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली सराटी आंतरवाली येथे सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघालेल्या बीड जिल्ह्यातील एका आंदोलकाचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. सुग्रीव बापू शिंदे असे मृत आंदोलकाचे नाव असून ते केज तालुक्यातील नांदुर घाट येथील रहिवासी होते. ही दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी गेवराई परिसरात घडली.
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी शनिवारपासून सराटी आंतरवाली येथे उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सुग्रीव शिंदे हे आपल्या सहकाऱ्यांसह सराटी आंतरवालीकडे निघाले होते. त्यांचे वाहन गेवराई परिसरात आले असताना शिंदे यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र धक्का आला. त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.
या घटनेमुळे नांदुर घाट परिसरासह मराठा आरक्षण आंदोलनातील कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
जरांगे यांच्या प्रमुख मागण्या काय?
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे यांनी पुन्हा आंदोलन सुरू केले आहे. ५८ लाख कुणबी नोंदींच्या आधारे पात्र मराठा कुटुंबांना तातडीने कुणबी जात प्रमाणपत्रे देणे, सातारा, कोल्हापूर, औंध आणि पुणे संस्थानचे गॅझेट लागू करून त्यानुसार शासन निर्णय काढणे तसेच आंदोलनादरम्यान आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेणे, या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत.
याशिवाय जात पडताळणीमध्ये नाकारलेली प्रमाणपत्रेही देण्यात यावीत, अशी मागणी जरांगे यांनी केली आहे.
जरांगे यांचे अकरावे उपोषण
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी यापूर्वी दहा वेळा उपोषण केले आहे. शनिवारपासून सुरू झालेले हे त्यांचे अकरावे उपोषण आहे. हे उपोषण अंतिम असल्याचे त्यांनी सांगितले आहे. सरकारने मागण्या मान्य न केल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’वर जाऊन उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.





