Ishan Warn Vaibhav Video Viral : आयपीएल २०२६ च्या ३६ व्या सामन्यात जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद आमनेसामने आले होते, ज्यामध्ये हैदराबाद विकेट्सनी दमदार विजय मिळवला. पण या सामन्यानंतर मैदानावरील खेळापेक्षा मैदानाबाहेर घडलेल्या एका संवादाची चर्चा अधिक रंगली आहे. बिहारच्या दोन हिऱ्यांमध्ये म्हणजेच इशान किशन आणि वैभव सूर्यवंशी यांच्यात झालेली गमतीशीर बातचीत सध्या चर्चेत आहे. या सामन्यात प्रथम राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर वैभव सूर्यवंशीने अवघ्या १५ व्या वर्षी हैदराबादविरुद्ध ३६ चेंडूत झंझावाती शतक ठोकून इतिहास रचला. या खेळीत त्याने १२ षटकार आणि ५ चौकारांची उधळण करत राजस्थानला २२८ धावांचा डोंगर उभारुन दिला होता. मात्र, अनुभवी इशान किशनच्या अर्धशतकी खेळीमुळे हैदराबादने हा सामना सहज जिंकला. सामन्यानंतर इशानने आपला बिहारी ‘भाई’ वैभव याची भेट घेतली आणि त्याला एक प्रेमळ इशारा दिला. ज्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. “माझ्या टीमविरुद्ध जरा जपून खेळ, नाही तर…” – जिओस्टारशी बोलताना इशान किशनने वैभवसोबत झालेल्या गप्पांचा खुलासा केला. इशान म्हणाला, “मी वैभवला सांगत होतो की, तू किती निर्दयीपणे फटकेबाजी करत होतास! तो ज्या पद्धतीने हिट मारत होता, ते पाहून आम्हाला भीती वाटत होती की जर तो अजून काही षटके थांबला असता, तर धावसंख्या २५० च्या पार गेली असती. त्यामुळे त्याला बाद करणे आमच्यासाठी महत्त्वाचे होते.” यानंतर पुढे मजेत इशान किशन म्हणाला, “मी आता त्याला बजावून सांगितलंय की, जेव्हा तू माझ्याविरुद्ध खेळशील, तेव्हा थोडं कमी मार, कारण तुझी सर्व आतली ‘सीक्रेट’ मला माहित आहेत! या मजेशीर संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. वैभवच्या या १०३ धावांच्या खेळीने राजस्थानला २२८ धावांपर्यंत नेले होते, पण इशान किशनच्या ७४ धावांच्या खेळीने हैदराबादला विजय मिळवून दिला. हेही वाचा – ‘…अन् सर्वांसमोर तिने अचानक ओढला अभिषेक शर्माचा हात, फलंदाजही झाला अवाक्’, पाहा VIDEO वैभव सूर्यवंशी: भारतीय क्रिकेटचा नवा ‘सुपरस्टार’ माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफनेही वैभवच्या फलंदाजीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. कैफ म्हणाला की, “वैभव ही पिढीतून एकदा मिळणारी प्रतिभा आहे. तो आयपीएलमध्ये इतक्या आत्मविश्वासाने खेळतोय जणू काही गल्ली क्रिकेट खेळत असावा. १० वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या अनुभवी खेळाडूसारखी त्याची शैली आहे. जर त्याने आपले लक्ष केंद्रित ठेवले, तर भारतीय क्रिकेटला पुढील २०-२५ वर्षांसाठी एक नवा सुपरस्टार मिळाला आहे.”