India AI Impact Summit 2026: “तंत्रज्ञानाचा अंतिम उद्देश सर्वांचे कल्याण आणि सर्वांचा आनंद हाच असायला हवा. ‘सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय’ ही भारताची संस्कृती आहे आणि याच भावनेतून भारत एआय (Artificial Intelligence) कडे पाहत आहे. एआय हे मानवी क्षमतेत वाढ करणारे साधन आहे, ते मानवाची जागा घेण्यासाठी किंवा नोकऱ्या हिरावण्यासाठी नाही,” असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. नवी दिल्ली येथे आयोजित ‘इंडिया एआई इम्पॅक्ट समिट २०२६’ दरम्यान माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भारताची एआई रणनीती, भविष्यातील आव्हाने आणि ‘विकसित भारत २०४७’ मधील या तंत्रज्ञानाच्या भूमिकेवर सविस्तर भाष्य केले. ‘सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय’ हाच मुख्य मंत्र – ग्लोबल साउथमध्ये पहिल्यांदाच अशा मोठ्या स्वरूपाच्या समिटचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या ध्येयवाक्याबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की, एआय हे केवळ नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान नसून ते सामाजिक बदलाचे साधन आहे. एआय प्रणाली जगातील विविध समाजांतील डेटा वापरते, त्यामुळे त्याचा लाभ केवळ सुरुवातीला स्वीकारणाऱ्या श्रीमंत वर्गाला न मिळता शेवटच्या टोकावरील व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे. विकसित भारतासाठी एआयचे महत्त्व – २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी एआई महत्त्वाची भूमिका बजावेल. पंतप्रधानांनी विविध क्षेत्रांतील उदाहरणे दिली. ते म्हणाले, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये टीबी आणि मधुमेहासारख्या आजारांचे निदान एआई द्वारे केले जात आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेत शिकण्यासाठी एआई प्लॅटफॉर्म मदत करत आहेत. ‘अमूल’च्या पुढाकाराने ३६ लाख महिला दुग्ध उत्पादकांना गुजराती भाषेत एआई द्वारे मार्गदर्शन दिले जात आहे. तसेच ‘भारत विस्तार’ उपक्रमातून शेतकऱ्यांना हवामानाची अचूक माहिती मिळत आहे. एआयमधील पूर्वग्रह आणि सुरक्षा – एआय सिस्टिममधील भाषिक आणि सांस्कृतिक पूर्वग्रहांबाबत (Biases) पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केली. केवळ इंग्रजी डेटावर आधारित एआय ग्रामीण भारतासाठी अपयशी ठरू शकते, म्हणूनच भारत प्रादेशिक भाषांमधील डेटासेट तयार करण्यावर भर देत आहे. सुरक्षिततेसाठी जानेवारी २०२५ मध्ये ‘एआय सेफ्टी इन्स्टिट्यूट’ स्थापन करण्यात आली असून, ‘डीपफेक’ आणि महिलांच्या सुरक्षिततेशी संबंधित धोक्यांविरुद्ध कडक नियम लागू करण्यात आले आहेत. नोकऱ्यांच्या असुरक्षिततेवर उत्तर – युवावर्गातील नोकरी जाण्याच्या भीतीवर बोलताना पंतप्रधान म्हणाले, “इतिहास साक्षी आहे की तंत्रज्ञानामुळे काम संपत नाही, तर त्याचे स्वरूप बदलते. भीतीवर उपाय म्हणजे पूर्वतयारी.” भारत सध्या जगातील अशा कौशल्य विकास मोहिमांमध्ये मोठी गुंतवणूक करत आहे ज्यामुळे तरुण एआई युगाचे नेतृत्व करतील. स्टॅनफोर्डच्या एआय इंडेक्समध्ये भारत तिसऱ्या स्थानावर असल्याचेही त्यांनी नमूद केले. आयटी क्षेत्राचे ४०० अब्ज डॉलर्सचे लक्ष्य – पंतप्रधानांच्या मते, एआयमुळे भारतीय आयटी (IT) क्षेत्र २०३० पर्यंत ४०० अब्ज डॉलर्सचा टप्पा गाठू शकते. सरकार ‘इंडिया एआई मिशन’ अंतर्गत स्टार्टअप्सना स्वस्त कॉम्प्युटिंग पॉवर आणि जीपीयू (GPU) उपलब्ध करून देत आहे. भारताला केवळ तंत्रज्ञानाचा वापरकर्ता नाही, तर निर्माता (Creator) बनायचे आहे. “एआयमध्ये आत्मनिर्भर भारताचा अर्थ असा आहे की, या डिजिटल शतकासाठी भारत स्वतःचा ‘कोड’ स्वतः लिहील आणि हा कोड आपल्या मानवी मूल्यांशी सुसंगत असेल.” — पंतप्रधान नरेंद्र मोदी