Accident on Mumbai-Goa highway : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. नागोठणे जवळील सुकली खिंडीत शुक्रवारी पहाटे एक खाजगी बसला उलटून भीषण अपघात झाला. या अपघातात दोन प्रवशांचा जागीच मृत्यू झाला असून, 38 प्रवासी जखमी झाले आहेत. यातील 10 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. नेमका अपघात कसा झाला? मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारी खाजगी लक्झरी बस सुकळी खिंडीतून जात असताना पहाटेच्या सुमारास खिंडीतील तीव्र वळणावर चालकाचा ताबा सुटला आणि बस थेट उलटली. अपघाताचा मोठा आवाज झाला. या आवाजाने स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अपघाताची माहिती मिळताच नागोठणे पोलीस आणि स्थानिक रेस्क्यू टीमने जखमींना बसमधून बाहेर काढले. जखमींना सुरुवातीला स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले, मात्र गंभीर जखमी असलेल्या 9 ते 10 प्रवाशांना तातडीने कळंबोली येथील एमजीएम (MGM) रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या अपघातातून बचावलेल्या प्रवाशांनी चालकाच्या वर्तणुकीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रवाशांनी आरोप केला आहे की प्रवास सुरू झाल्यापासूनच चालक अतिशय वेगाने आणि नागमोडी पद्धतीने बस चालवत होता. चालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी दरम्यान, या घटनेनंतर परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. दोषी चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. खाजगी ट्रॅव्हल्सच्या चालकांकडून होणारी वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली प्रवाशांच्या जीवावर बेतत आहे. हेही वाचा : सनरायझर्स हैदराबादने उघडले विजयाचे खाते, केकेआरचा सलग दुसऱ्या सामन्यात दारुण पराभव