Top 10 News : प्रभात हा महाराष्ट्रातील आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. राज्य, देश आणि जागतिक पातळीवरील ताज्या घडामोडी आणि सखोल विश्लेषण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो. चला, जाणून घेऊया आज, 10 मे 2026 रोजीच्या टॉप 10 महत्त्वाच्या राजकीय घडामोडी… (Top 10 News) 1) विकास लवांडे शाईफेक प्रकरण तापलं, शरद पवार अॅक्शन मोडमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर झालेल्या शाईफेक प्रकरणानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. या घटनेची गंभीर दखल घेत शरद पवार यांनी थेट राज्याच्या पोलीस महासंचालकांशी आणि पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी संपर्क साधला. पुण्यातील मोदी बाग निवासस्थानी विकास लवांडे यांनी शरद पवारांची भेट घेत संपूर्ण घटनाक्रम सांगितला. त्यानंतर पवारांनी लवांडेंना तातडीने पोलीस संरक्षण देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुंबईत होणाऱ्या बैठकीतही शरद पवार हा मुद्दा उपस्थित करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणावर सरकारची भूमिका काय असणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. (Top 10 News ) 2) मंत्रिमंडळातील ४ मंत्र्यांचा खरात प्रकरणात सहभाग, नाना पटोलेंचा दावा नाना पटोले यांनी नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणावरून राज्य सरकारवर गंभीर आरोप करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. या प्रकरणात सरकारमधील चार बडे मंत्री सहभागी असल्याचा दावा त्यांनी केलाय. नाना पटोले म्हणाले की, अशोक खरात प्रकरणाचा सखोल तपास झाल्यास अनेक धक्कादायक माहिती समोर येऊ शकते. तसेच “माहिती बाहेर येऊ नये म्हणून अशोक खरातचाही एपस्टीनप्रमाणे मृत्यू होऊ शकतो,” अशी भीती त्यांनी व्यक्त केली. चार मंत्र्यांची नावे लवकरच पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दोषी आढळल्यास संबंधित मंत्र्यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. (Top 10 News ) 3) विहीर खचल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील धानोरा गावात अत्यंत दुर्दैवी घटना घडलीय. विहिरीत मोटर पंप बसवण्याचे काम सुरू असताना अचानक विहीर खचल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झालाय. बाजीराव काकडे आणि त्यांची दोन मुले आजिनाथ व शाम काकडे अशी मृतांची नावे आहेत. शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास हा अपघात घडला. विहीर खचल्याचा आवाज येताच ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली, मात्र तिघेही ढिगाऱ्याखाली दबले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे धानोरा गावावर शोककळा पसरली आहे. मेहनती आणि मनमिळावू काकडे कुटुंबाच्या निधनाने संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करत आहे. 4) सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; पशुसंवर्धन विभागात 3103 पदांची भरती राज्यातील तरुणांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. राज्याच्या पशुसंवर्धन विभागातील तब्बल 3103 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्यानंतर या भरतीला गती मिळाली आहे. MPSC ने पशुधन विकास अधिकारी गट ‘अ’ची 2795 आणि सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन गट ‘अ’ची 308 पदे भरण्याचा निर्णय घेतलाय. या पदांसाठी संगणक आधारित चाळणी परीक्षा 11 जून 2026 रोजी मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथे होणार आहे. सायंकाळी 5.30 ते 7 या वेळेत परीक्षा पार पडणार असून गुणवत्तेनुसार पुढील निवड प्रक्रिया केली जाणार आहे. ग्रामीण भागातील पशुवैद्यकीय सेवांवरील ताण कमी करण्यासाठी ही भरती महत्त्वाची मानली जातेय. (Top 10 News ) 5) मोदींच्या सुरक्षेत मोठी त्रुटी; ताफ्याच्या मार्गावर सापडली स्फोटके नरेंद्र मोदी यांच्या बेंगळुरू दौऱ्यापूर्वी मोठी खळबळ उडाली आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग केंद्रापासून सुमारे ३ किलोमीटर अंतरावर पोलिसांनी दोन जिलेटीनच्या कांड्या जप्त केल्यात. पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी सुरू असलेल्या प्री-व्हिजिट सॅनिटायझेशन मोहिमेदरम्यान हे स्फोटक साहित्य आढळून आले. त्यानंतर बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला तातडीने घटनास्थळी पाचारण करण्यात आले. परिसर सुरक्षित करून सखोल तपासणी करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून स्फोटके बांधकामातील निष्काळजीपणामुळे राहिली होती की मुद्दाम ठेवण्यात आली होती, याचा तपास सुरू आहे. 6) मुख्यमंत्री विजय यांचा पहिला मास्टरस्ट्रोक; पदभार स्वीकारताच तीन मोठ्या निर्णयांवर स्वाक्षरी विजय यांनी तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच तीन मोठे निर्णय घेत राज्याच्या राजकारणात जोरदार एंट्री केलीय. चेन्नईतील शपथविधीनंतर मंत्रालयात पोहोचताच त्यांनी महत्त्वाच्या फाईल्सवर स्वाक्षऱ्या केल्या. विजय सरकारने घरगुती ग्राहकांसाठी 200 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचा निर्णय घेतलाय. तसेच राज्यात अमली पदार्थांवर नियंत्रण मिळवण्यासाठी विशेष कृती दल (STF) स्थापन करण्यास मंजुरी दिलीय. महिलांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र स्पेशल फोर्स उभारण्याचाही मोठा निर्णय घेण्यात आलाय. दरम्यान, शपथविधी सोहळ्यात राहुल गांधी यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली. विजय आणि राहुल गांधी यांचा सेल्फी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (Top 10 News ) 7) पाकिस्तानमध्ये भीषण बॉम्बस्फोट; 15 पोलिस अधिकारी ठार पाकिस्तान मधील खैबर पख्तुनख्वा प्रांतातील बन्नू जिल्ह्यात भीषण बॉम्बस्फोट झाला असून या हल्ल्यात 15 हून अधिक पोलिस अधिकारी ठार झाल्याची माहिती समोर आलीय. अफगाण सीमेजवळील पोलिस स्टेशनला लक्ष्य करत हा हल्ला करण्यात आला. स्फोटकांनी भरलेली कार पोलिस स्टेशनच्या गेटवर आदळल्यानंतर जोरदार स्फोट झाला. स्फोट इतका भीषण होता की परिसरातील अनेक घरांचेही नुकसान झाले. घटनेवेळी अनेक पोलिस अधिकारी ड्युटीवर उपस्थित होते. स्फोटानंतर मदतीसाठी धावलेल्या पोलिसांवरही हल्ला करण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय. या हल्ल्यात ड्रोनचाही वापर झाल्याची शक्यता व्यक्त केली जातेय. 8) टाटा नेक्सॉनमध्ये 10 लाखांच्या आत मिळणार पॅनोरामिक सनरूफ टाटा मोटर्सने ग्राहकांसाठी नवीन Tata Nexon Pure+ PS व्हेरिएंट लॉन्च केला आहे. या व्हेरिएंटमध्ये आता 10 लाख रुपयांच्या आत पॅनोरामिक सनरूफची सुविधा मिळणार आहे. पेट्रोल मॅन्युअल व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 9.59 लाख रुपये ठेवण्यात आलीय. नवीन व्हेरिएंट पेट्रोल, डिझेल आणि CNG पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. यात 10.25 इंच टचस्क्रीन, वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay, क्रूझ कंट्रोल, रिअर AC व्हेंट्स आणि व्हॉइस-असिस्टेड सनरूफ ऑपरेशनसारखी प्रीमियम फीचर्स देण्यात आलेत. याआधी पॅनोरामिक सनरूफ हे फीचर केवळ महागड्या व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होते. कमी बजेटमध्ये प्रीमियम SUV शोधणाऱ्या ग्राहकांसाठी Tata Nexon Pure+ PS हा आकर्षक पर्याय ठरणार आहे. (Top 10 News ) 9) ‘राजा शिवाजी’चा बॉक्स ऑफिसवर धडाका कायम राजा शिवाजी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत असून नवव्या दिवशीही चित्रपटाने जोरदार मुसंडी मारलीय. रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनित या चित्रपटाने अवघ्या 9 दिवसांत भारतात 76.42 कोटी रुपयांचे ग्रॉस कलेक्शन केलंय. 100 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत 64.43 कोटी रुपयांची नेट कमाई केली असून अर्ध्याहून अधिक बजेट वसूल केलंय. दमदार कथानक, भव्य सादरीकरण आणि अजय-अतुल यांच्या संगीतामुळे चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय. दुसऱ्या शनिवारी चित्रपटाच्या ऑक्युपन्सीत मोठी वाढ झाली असून रात्रीच्या शोमध्ये 50 टक्क्यांहून अधिक प्रेक्षक उपस्थिती नोंदवण्यात आली. (Top 10 News ) 10) मैदानात जडेजानं डिवचलं, राशिद खानचा सोशल मीडियावर ‘पॉकेट’ पलटवार! आयपीएल २०२६ मध्ये राजस्थानच्या रवींद्र जडेजाने जोस बटलरला बाद केल्यावर आपल्या खिशाकडे इशारा करत ‘पॉकेट सेलिब्रेशन’ केले होते. मात्र, गुजरात टायटन्सने ७७ धावांनी मोठा विजय मिळवल्यानंतर राशिद खानने जडेजाला चोख प्रत्युत्तर दिले. राशिदने एक व्हिडीओ शेअर केला, ज्यामध्ये तो आपल्या खिशात काहीतरी शोधताना दिसतो आणि शेवटी हसून इशारा करतो की त्याच्या खिशात सामन्याचे ‘२ पॉइंट्स’ आहेत. “तुम्ही फक्त विकेट घेतली, आम्ही पूर्ण सामनाच खिशात घालून नेला,” असा सणसणीत टोला त्याने या व्हिडिओतून लगावला आहे. (Top 10 News )