Former MLA Baliram Patil Kotkar: हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि या जिल्ह्याच्या निर्मिती प्रक्रियेतील महत्त्वाचे शिल्पकार माजी आमदार बळीराम पाटील कोटकर (भानखेडकर) यांचे गुरुवारी, २३ एप्रिल रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोणताही राजकीय वारसा पाठीशी नसताना केवळ जनसंपर्क आणि कार्यक्षमतेच्या जोरावर त्यांनी राजकारणात निर्माण केलेले अढळ स्थान हिंगोलीच्या राजकीय इतिहासात सदैव स्मरणात राहील. पोलीस पाटील ते आमदार… बळीराम पाटील कोटकर यांचा जन्म १५ ऑगस्ट १९४७ रोजी, भारताच्या स्वातंत्र्यदिनी सेनगाव तालुक्यातील भानखेडा येथे झाला होता. त्यांचा शून्यातून विश्व निर्माण करण्याचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी राहिला आहे. आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात त्यांनी भानखेडा गावचे पोलीस पाटील आणि सरपंच म्हणून केली होती. त्यानंतर सक्रिय राजकारणात प्रवेश करत त्यांनी १९९० आणि १९९५ अशा सलग दोन विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर विजय मिळवून हिंगोलीवर आपले वर्चस्व सिद्ध केले. आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात त्यांनी विधानसभेच्या आश्वासन समितीचे अध्यक्ष म्हणून काम करताना आपल्या प्रशासकीय कौशल्याची आणि कामाची वेगळी छाप जनमानसावर सोडली होती. हिंगोली जिल्ह्याला स्वतंत्र ओळख मिळवून देण्यात आणि सेनगाव तालुक्याची निर्मिती करण्यात कोटकर यांचा मोलाचा वाटा होता. प्रशासकीय सोयी आणि ग्रामीण भागाचा विकास हा त्यांचा ध्यास होता, म्हणूनच त्यांना हिंगोली जिल्हा निर्मितीचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. त्यांच्या निधनामुळे हिंगोली जिल्ह्यासह सेनगाव तालुक्यावर शोककळा पसरली असून एक अभ्यासू आणि लोकसंग्रह जपणारा नेता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुली आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.