Farm loan waiver: मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा; कर्जमाफीची थेट तारीख सांगितली, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
Farm loan waiver: “३० जूनपर्यंत कर्जमाफीची घोषणा केली जाईल. कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना पुढील पीककर्ज मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही.”

Farm loan waiver: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा करत ३० जूनपूर्वी शेतकरी कर्जमाफी जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच या योजनेचा लाभ घेणारे शेतकरी पुढील पीककर्ज चक्रासाठीही पात्र राहतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
मुंबई येथे गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “३० जूनपर्यंत कर्जमाफीची घोषणा केली जाईल. कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना पुढील पीककर्ज मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही.”
निवडणुका कर्जमाफीच्या निर्णयात अडथळा नाही –
राज्यातील आगामी विधान परिषद निवडणुका कर्जमाफीच्या निर्णयात अडथळा ठरणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “कर्जमाफीचा निर्णय निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच जाहीर करण्यात आला आहे. विधान परिषद निवडणुकीतील मतदार हे स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी असतात. त्यामुळे त्याचा शेतकऱ्यांवर परिणाम होणार नाही. आवश्यकता भासल्यास निवडणूक आयोगाची परवानगी घेतली जाईल,” असे फडणवीस यांनी सांगितले.
एल निनोचे संकट; सरकार सज्ज
यंदाच्या खरीप हंगामावर एल निनोचा मोठा परिणाम होण्याची शक्यता असल्याबद्दलही मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली. “राज्यासमोर यंदा एल निनो हे सर्वात मोठे आव्हान आहे. त्यावर मात करण्यासाठी नियोजनावर भर दिला जात आहे,” असे ते म्हणाले.
यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता असल्याने जलसंधारणाच्या कामांना गती देण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. “जलयुक्त शिवार अभियानाची कामे वेगाने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एल निनोच्या परिणामांना तोंड देण्यासाठी प्रत्येक जिल्हा प्रशासन सज्ज करण्यात आले आहे,” असे सांगत त्यांनी नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले.
दरम्यान, प्रविण कुमार यांनी विदर्भात पुढील पाच ते सात दिवस तीव्र उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा दिला आहे. वर्धा येथे ४७.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून नागपूरमध्येही यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४६ अंशांपेक्षा अधिक तापमान नोंदविण्यात आले.
इंधन तुटवड्याच्या अफवा; सरकारचे स्पष्टीकरण
राज्यात काही भागांत पेट्रोल-डिझेलच्या तुटवड्याच्या अफवा पसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागरिकांना घाबरून जाऊन इंधन खरेदी करू नये, असे आवाहन केले. “राज्यात सध्या पुरेसा इंधनसाठा उपलब्ध आहे. मात्र अचानक मागणी वाढल्याने घबराटीचे वातावरण निर्माण होत आहे. इंधन साठवणूक करणाऱ्यांवर लक्ष ठेवून कारवाई केली जाईल,” असा इशारा त्यांनी दिला.
वांद्रे येथील हिंसाचारावर नियंत्रण –
मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानक परिसरातील अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान झालेल्या हिंसाचाराबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, काही समाजकंटकांनी पोलिसांवर दगडफेक केली होती. “परिस्थितीवर पोलिसांनी पूर्ण नियंत्रण मिळवले असून हिंसाचाराला चिथावणी देणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे,” असे त्यांनी सांगितले. या प्रकरणी मुंबई पोलीस यांनी १६ जणांना अटक केली असून दगडफेकीत पाच पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत.





