Employment : 51 हजारांहून अधिक तरुणांना सरकारी नोकरी; पंतप्रधान मोदींनी रोजगार मेळ्यात दिली नियुक्तीपत्रे
Employment : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20व्या रोजगार मेळ्यात 51 हजारांहून अधिक तरुणांना नियुक्तीपत्रे दिली. तरुणांसाठी रोजगार, कौशल्य विकास आणि स्टार्टअप संधींबाबत मोदींचे आवाहन.

Employment : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी 20व्या रोजगार मेळ्यात विविध सरकारी विभागांमध्ये नियुक्त झालेल्या 51 हजारांहून अधिक तरुणांना नियुक्तीपत्रे दिली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या कार्यक्रमात त्यांनी नव्या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी देशाच्या विकासात तरुणांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. भारतीय तरुणांची कौशल्ये, नवकल्पना आणि उद्योजकतेमुळे जगाचा भारतावर विश्वास वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले.
मुक्त व्यापार करारांमुळे भारतीय उद्योजकांना नवीन बाजारपेठा आणि तरुणांना रोजगाराच्या संधी मिळत असल्याचे मोदी यांनी सांगितले. भारत जगातील तिसरी मोठी स्टार्टअप परिसंस्था असल्याचे सांगत, जवळपास निम्मे मान्यताप्राप्त स्टार्टअप आता द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील शहरांमध्ये असल्याचे त्यांनी नमूद केले.
कौशल्य विकासासाठी राष्ट्रीय शिक्षण धोरण, स्किल इंडिया, प्रधानमंत्री कौशल विकास योजना आणि प्रशिक्षणार्थी योजनांवर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. पीएम-सेतू योजनेत 60 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून एक हजार सरकारी आयटीआयचे आधुनिकीकरण केले जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.
खासगी क्षेत्रातील रोजगार वाढवण्यासाठी प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत पहिल्यांदा नोकरी करणाऱ्या तरुणांना 15 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन दिले जाते.
नव्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या समस्या संवेदनशीलतेने सोडवाव्यात, सतत नवीन कौशल्ये आत्मसात करावीत आणि प्रशासन अधिक गतिमान करण्यासाठी काम करावे, असे आवाहन मोदी यांनी केले. नागरिकांचा सरकारशी येणारा अनुभव त्यांच्या वर्तनातून आणि कामातून ठरतो, असेही त्यांनी सांगितले.





