Eknath Shinde : एकनाथ शिंदेंची दादा भुसेंसोबत चार तास बैठक! अधिकाऱ्यांना दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश
Eknath Shinde : या बैठकीत एकनाथ शिंदेंनी राज्यातील शाळांचे आधुनिकीकरण आणि शिक्षण व्यवस्थेत प्रत्यक्ष, दृश्यमान आणि गुणवत्तापूर्ण बदल घडवून आणण्यासाठी स्पष्ट, सर्वसमावेशक आणि कालबद्ध कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले.

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी नंदनवन या निवासस्थानी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे तसेच शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तब्बल चार तास बैठक घेऊन राज्यातील शिक्षण क्षेत्राचा सविस्तर आढावा घेतला.
या बैठकीत एकनाथ शिंदेंनी राज्यातील शाळांचे आधुनिकीकरण आणि शिक्षण व्यवस्थेत प्रत्यक्ष, दृश्यमान आणि गुणवत्तापूर्ण बदल घडवून आणण्यासाठी स्पष्ट, सर्वसमावेशक आणि कालबद्ध कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले.
विभागाच्या विविध उपक्रमांची, योजनांची आणि आतापर्यंत झालेल्या प्रगतीची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांना दिली. शिक्षण मंत्रालयाकडून सुरू असलेल्या चांगल्या कामाचे कौतुक करताना एकनाथ शिंदे यांनी शिक्षण विभागाने आता मिशन मोडवर काम करून हे चांगले काम राज्यातील प्रत्येक शाळेपर्यंत आणि विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवावे, असे निर्देश दिले.
गुणवत्तापूर्ण आणि भविष्यवेधी शिक्षणव्यवस्था आपण निर्माण केली पाहिजे : एकनाथ शिंदे
“आपल्या मुलांच्या आकांक्षा बदलत आहेत, त्यांची स्वप्ने बदलत आहेत. त्यानुसार आपल्या शाळाही बदलल्या पाहिजेत. महाराष्ट्रातील प्रत्येक मुलाला भविष्यातील संधी आणि आव्हानांसाठी तयार करणारी आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि भविष्यवेधी शिक्षणव्यवस्था आपण निर्माण केली पाहिजे.” असे एकनाथ शिंदे बैठकीत म्हणाले.
यावेळी शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, खासदार मिलिंद देवरा, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल आणि शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
📍 #मुंबई |
शालेय शिक्षण विभागाचा सर्वांगीण आढावा घेण्यासाठी काल नंदनवन या शासकीय निवासस्थानी विशेष बैठक पार पडली. यावेळी राज्यातील शाळांचे आधुनिकीकरण आणि शिक्षण व्यवस्थेत प्रत्यक्ष, दृश्यमान आणि गुणवत्तापूर्ण बदल घडवून आणण्यासाठी स्पष्ट, सर्वसमावेशक आणि कालबद्ध कृती आराखडा तयार… pic.twitter.com/Jl994EydWx
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 23, 2026
या कृती आराखड्यात शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांना सोबत घेणे, शिक्षकांसाठी प्रशिक्षण, प्रोत्साहन आणि प्रेरणादायी उपक्रम राबवणे तसेच उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन व योग्य सन्मान देणे, यावर विशेष भर देण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या विविध शिक्षणविषयक योजनांची महाराष्ट्रात प्रभावी आणि गतिमान अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही एकनाथ शिंदे यांनी दिल्या.
महत्वाच्या बाबी
- कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी दर आठवड्याला प्रगतीचा आढावा घेण्यात येणार आहे.
- अडचणी दूर करून कामाला गती देण्यासाठी या बैठकीत आवश्यक निर्णय घेतले जातील.
- शाळा बदलल्या तर विद्यार्थ्यांचे भविष्य बदलेल आणि विद्यार्थ्यांचे भविष्य बदलले तर महाराष्ट्राचे भविष्य बदलेल.
- शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक चांगला उपक्रम मिशन मोडवर पुढे नेऊन त्याचा लाभ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.
अभिजीत दिपकेंनी केली होती राजीनाम्याची मागणी
कॅाकरोच जनता पार्टाचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आपला मोर्चा आता राज्यातील शाळांकडे वळवला आहे. ‘स्कूल ठीक करो’ मोहिम त्यांनी हाती घेतली असून विविध ठिकाणच्या शाळांना ते भेट देत आहेत. नुकत्याच एका शाळेला भेट दिल्यानंतर त्यांनी अनेक सुविधांचा अभाव पाहून संताप व्यक्त करत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.





