UP Election 2027 : CJP यूपी विधानसभा निवडणूक लढवणार का ? अभिजीत दीपकेंच्या घोषणेने राजकीय वर्तुळात खळबळ
UP Election 2027 : कॉकरोच जनता पार्टी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2027 लढवणार नाही. अभिजीत दीपके यांनी कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार नसल्याचे स्पष्ट केले.

UP Election 2027 : उत्तर प्रदेशातील २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत कॉकरोच जनता पार्टी (CJP) सहभागी होणार नाही. तसेच कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा देणार नसल्याचे पक्षाचे संयोजक अभिजीत दीपके यांनी स्पष्ट केले आहे. छत्रपती संभाजीनगर येथे मंगळवारी (२४ नोव्हेंबर) पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही भूमिका मांडली.
निवडणुकीत जात आणि धर्माच्या मुद्द्यांपेक्षा तरुणांचे प्रश्न महत्त्वाचे ठरले पाहिजेत, असे दीपके म्हणाले. आज जग कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि अक्षय ऊर्जेवर चर्चा करत आहे. मात्र, आपल्या राजकारणात अजूनही जात आणि धर्माच्या मुद्द्यांवर निवडणुका लढवल्या जातात. हे किती दिवस सुरू राहणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
राजकीय पक्षांनी तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यावर लक्ष केंद्रित करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. उत्तर प्रदेशात कोणाचे सरकार यावे किंवा कोणाचे येऊ नये, याबाबत CJP कोणतीही भूमिका घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, संविधान दिनानिमित्त २६ नोव्हेंबरला नागपुरातील संविधान चौकात CJP कडून सभा आयोजित करण्यात आली आहे. सायंकाळी ४ वाजता हा कार्यक्रम होणार असून, लोकशाही आणि संविधानाचे संरक्षण हा त्याचा मुख्य विषय असेल.





