Shashi tharoor convoy attacked in kerala : काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या ताफ्यावर केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यात काही अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. केरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युडीएफ उमेदवार ए. पी. अनिल कुमार यांच्या प्रचारासाठी शशी थरूर जात होते. अचानक काही अज्ञातांनी शशी थरूर यांचा ताफा अडवला. तसेच सुरक्षा रक्षकाला मारहाण केली. आंदोलकांनी केवळ त्यांचा ताफाच रोखला नाही, तर त्यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या गनमॅनलाही मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ दखल घेत २ जणांना ताब्यात घेतले आहे. नेमकं काय घडलं? समोर आलेल्या माहितीनुसार, शशी थरूर हे ‘यूडीएफ’चे (UDF) उमेदवार एपी अनिल कुमार यांच्या प्रचारासाठी मलप्पुरममध्ये पोहोचले होते. यावेळी एका गाडीतून काही तरुण खाली उतरले आणि त्यांनी थेट शशी थरूर यांचा ताफा अडवला. त्यानंतर या तरुणांनी थरूर यांच्या गाडीवर हल्ला करण्यास सुरुवात केली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शशी थरूर यांचा सुरक्षा रक्षक तातडीने गाडीबाहेर पडला आणि त्याने त्या तरुणांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी झालेल्या झटापटीत अज्ञात तरुणांनी सुरक्षा रक्षकाला मारहाण केली. पोलिसांनी या घटनेनंतर तातडीने हालचाल करत दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, केरळ विधानसभेच्या १४० जागांसाठी ९ एप्रिल रोजी मतदान होणार असून, ४ मे रोजी मतमोजणी आणि निकाल जाहीर होणार आहेत. त्यासाठी सुरू असलेल्या प्रचारादरम्यान घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. हेही वाचा: Fruit Market : कलिंगड-खरबुजाला अवकाळीचा फटका; मार्केट यार्डात दरांमध्ये मोठी घसरण