Maharashtra : महाराष्ट्रातील कॅबिनेट मंत्र्याच्या कुटुंबियांवर हल्ला; रुग्णालयात उपचार सुरू, नेमकं काय घडलं?
Maharashtra : छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात जमिनीच्या वादातून मंत्री अतुल सावे यांच्या मोठ्या भावाला आणि पुतण्याला लाठ्या-काठ्यांनी मारहाण. दोघे जखमी.

Maharashtra : जमिनीच्या बांधावरून आणि शेतात जाण्याच्या रस्त्यावरून झालेल्या वादातून राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते अतुल सावे यांच्या मोठ्या भावासह पुतण्याला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना पैठण तालुक्यातील नायगाव खंडेवाडी येथे घडली. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नायगाव खंडेवाडी येथे सावे कुटुंबाची शेतजमीन आहे. या जमिनीच्या बांधावरून तसेच शेतात जाण्याच्या रस्त्यावरून काही स्थानिक व्यक्तींशी त्यांचा वाद सुरू होता. या वादातून काही जणांनी सावे कुटुंबातील सदस्यांवर हल्ला केला.
या मारहाणीत अतुल सावे यांचे मोठे बंधू अजित मोरेश्वर सावे (वय ७०) आणि त्यांचा पुतण्या अमेय अजित सावे (वय ३५) जखमी झाले. दोघेही छत्रपती संभाजीनगरमधील खडकेश्वर परिसरातील रहिवासी आहेत. हल्लेखोरांनी लाठ्या-काठ्यांनी मारहाण केल्याची प्राथमिक माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच बिडकीन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींची रुग्णालयात विचारपूस करण्यात आली असून, त्यांचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू आहे. हल्ला करणाऱ्या संशयितांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.
दरम्यान, या घटनेला राजकीय पार्श्वभूमी आहे का, याचीही चर्चा सुरू झाली आहे. मात्र, सध्या जमिनीच्या वादातूनच हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती असून, पोलिसांच्या तपासानंतरच हल्ल्याचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.





